कर्जासाठी खोटी कागदपत्रे देऊन भारतीय स्टेट बँकेची फसवणूक प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. नागपूरमधील विशेष पीएमएलए न्यायालयात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जळगावमधील प्रसिद्ध आर. एल. म्हणजे राजमल लखीचंद ग्रुपवर ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात यापूर्वी केंद्रीय अन्वेषन विभागाने (सीबीआय) तीन गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्यात मनी लॅण्डरिंगचा प्रकार समोर आल्यावर ईडीकडे हे प्रकरण दिले.
जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद म्हणजेच आर. एल. ग्रुप विरोधातील हे प्रकरण आहे. या बड्या ग्रुपने स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्ज प्रकरणातून तब्बल 352 कोटी रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सर्वात आधी सीबीआयने तपासले होते. त्या संदर्भात सीबीआयने तीन वेगवेगळे एफआयआर दाखल केले होते. त्यानंतर याप्रकरणात मनी लॉन्ड्रीग झाल्याच्या संशय आला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्यात आला आहे.
ईडीने याप्रकरणी 17 ऑगस्ट 2023 रोजी जळगावसह नाशिक, ठाणे अशा महाराष्ट्रातील तेरा ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी तब्बल 24 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्याचे दागिने जप्त केले होते. तसेच 1 कोटी 21 लाख रुपयांची रोख रक्कम ही जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास अनेक महिने सुरु होता. हा तपास पूर्ण केल्यानंतर ईडीने नागपुरातील विशेष पीएमएलए कोर्टासमोर प्रॉसिक्युशन कंप्लेंट (चार्जशीट) दाखल केली आहे.
आर एल ग्रुपने भारतीय स्टेट बँकेकडून कर्ज घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यासाठी खोटे सोने खरेदी विक्रीचे व्यवहार दाखवल्याचे आरोप ठेवला आहे. तसेच स्टेट बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची रक्कम दुसऱ्या व्यवसायात वळवण्यात आली आहे. तसेच बँकेकडे गहाण असणारी संपत्ती परस्पर विकून बँकेची 352 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेत फसवणूक करण्यात आली, असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहे.