सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग (molestation) केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी आरपीआय (RPI) तसेच कॉंग्रेस समर्थक शेकडो महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बार्शीचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी एका महिलेचा विनयभंग केला असल्याचा आरोप आहे. तसेच ते नेहमीच अरेरावीची भाषा वापरत असतात. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज बार्शी तहसील कार्य़ालसमोर मोर्चा काढत निषेध नोंदवलाय. काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्त्यानी आपल्यावर पोलिस निरीक्षक शेळके यांनी विनयभंग केल्याचा आरोप यावेळी केला. तसेच त्यांच्याविरोधात गु्न्हा नोंद करुन तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिलेचा जबाब नोंदवला होता मात्र त्याबाबत अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही.
प्रहार संघटना पोलिसांच्या बाजुने
दरम्यान पोलिसांच्या विरोधात सुरु असलेलं आंदोलन पाहून प्रहार संघटनेच्यावतीने पोलिसांच्या सर्मथनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संबधित आंदोलन करणाऱ्या संघटनेने महिलांना पैसे देऊन मोर्चात सहभागी केले आहे असा आरोप प्रहारच्या संजीवनी बारंगुळे यांनी केला. तसेच पोलिस निरीक्षक शेळके बार्शीत आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न कमी झाले आहेत. एखादा अधिकारी चांगला काम करत असताना खोटे आरोप करुन आंदोलन करणे चुकीचे आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक शेळके यांच्या समर्थनार्थ आम्ही आहोत असेही मत प्रहारच्या पदाधिकारी संजीवनी बारंगुळे यांनी व्यक्त केले.
दोन्ही बाजुने मोर्चे निघाल्याने संभ्रम
दोन्ही बाजुने मोर्चे निघाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. एका बाजुने गुन्हा दाखल करण्याची मागणी तर दुसऱ्या बाजुने समर्थन त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावरच असे आरोप झाल्याने पोलीस याबाबत आता काय निर्णय घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पोलीस ठाण्याच रोज अनेकांची ये जा असते पोलिसांच्या भाषेबाबत अनेकदा तक्रारी होता. तोच प्रकार बार्शीत पुन्हा समोर आला आहे. याप्रकरणात कुणाचे आरोप खरे हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. मात्र त्यासाठी या प्रकरणाची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार हे मात्र स्पष्ट झाले आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर असे आरोप झाल्याने पोलीस खात्यातही खळबळ माजली आहे.