सोलापूर : सोलापूरमध्ये 14 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सर्व विद्यार्थिनी सिध्देश्वर वुमन पॉलिटेक्निक कॉलेज (Siddeshwar Womens Polytechnic College)च्या विद्यार्थिनी असून कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहतात. हॉस्टेलमधील जेवणातून विद्यार्थिनीं (Students)ना विषबाधा झाली आहे. काल रात्री हॉस्टेलमधील जेवण खाल्ल्यानंतर आज सकाळपासून त्यांना जुलाब आणि उलट्या सुरु झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी सोलापुरातील सिध्देश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी मेस चालकाला ताब्यात घेतले आहे.
बाधित मुलींच्या तक्रारीनंतर वसतीगृहाच्या स्वयंपाकगृहातील नमुने घेतले आहेत. हे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्नामध्ये अळ्या असल्याची मुलींनी जबाबात नमूद केले आहे. संबंधित हॉस्टेलमधील मेस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जोडभावी पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी सांगितले.
सिध्देश्वर वुमन पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एकूण 45 विद्यार्थिनी राहतात. नेहमीप्रमाणे काल रात्री हॉस्टेलमध्ये सर्व मुली जेवण करुन झोपल्या. मात्र सकाळी उठल्यानंतर 18 मुलींना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. ज्या मुलींनी रात्री जेवणात छोलेची भाजी खाल्ली होती, त्यांना सकाळी त्रास झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. मुलींना जुलाब आणि उलट्या होऊ लागल्याने तात्काळ सिद्धेश्वर रुग्णालयात दाखल करत उपचार सुरु करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. सध्या पोलीस विद्यार्थिनींचे जबाब नोंदवत आहेत. चौकशीअंतीच नेमके कारण समोर येईल. (More than 15 female students of Siddeshwar Womens Polytechnic College suffer from food poisoning in Solapur)