उत्तर प्रदेश : मुलगी ड्रग्ज (Drugs)च्या आहारी गेल्याने कंटाळलेल्या आईने गळा आवळून तिची हत्या (Murder) केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये उघडकीस आली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर महिलेने स्वतःच पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिला तेथून पळून गेली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह (Deadbody) ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गरिमा गार्डन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी टिला मोड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. नफिसा असे हत्या करणाऱ्या आईचे नाव आहे, तर अमरीन असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नफिसाची 19 वर्षीय मुलगी अमरीन ड्रग्जच्या आहारी गेली होती. यामुळे नफिसा खूप नाराज होती. नशेच्या आहारी गेल्याने अमरीन वारंवार घरातून पळून जायची. यामुळे नफिसाने अमरीनची उशीने गळा आवळून हत्या केली. हत्येची माहिती पोलिसांना दिल्यानंतर महिला फरार झाली आहे. तिने आपला मोबाईलही बंद ठेवला आहे. पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.
नफिसाच्या पतीचा पाच वर्षापूर्वी मृत्यू झाला असून ती छोटी-मोठी कामं करून घरखर्च चालवत होती. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगी अमरीन नशेच्या आहारी गेली. लाजपत नगर येथील एका खाजगी रुग्णालयात ती काम करते. मुलगी अमरीनची हत्या करण्यापूर्वी अर्धा तास आधी नफिसाने मुलगा असद (10) आणि मुलगी नसरीन (12) यांना बटाटे आणण्यासाठी बाजारात पाठवले. त्यानंतर तिने ही हत्या केली. (Mother kills daughter due to drug addiction in Ghaziabad Uttar Pradesh)