भोपाळ : एका व्यक्तीने दोन लग्न केली. दोन्ही बायकांना नवऱ्यासोबतच रहायच होतं. त्यांना नवऱ्याला आपल्यापासून दूर होऊ द्यायच नव्हतं. त्यावरुन त्यांच्यात भांडण सुरु होती. अखेर हे प्रकरण परामर्श न्यायालय गेलं. त्यात न्यायालयाने दोघींना समान न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. घटिया येथे राहणाऱ्या व्यक्तीने 15 वर्षांपूर्वी बामोरा येथे राहणाऱ्या महिलेबरोबर लग्न केलं. काही काळापर्यंत पती-पत्नीमध्ये सगळं काही सुरळीत सुरु होतं.
त्यांना एक मुलगाही झाला. हळूहळू पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले. हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायालयात या प्रकरणात निकाल लागायला 15 वर्ष लागली. त्या व्यक्तीला आपल्या पत्नीसोबतच रहाव लागेल, असा कोर्टाने आदेश दिला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील हे प्रकरण आहे.
दोघींना नवरा हवा होता, पण….
न्यायालयाने त्या व्यक्तीला पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले. पण त्या 15 वर्षात खटला सुरु असताना, त्या व्यक्तीने दुसरं लग्न केलं. त्या विवाहापासून त्याला दोन मुलं आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिली पत्नी त्या व्यक्तीसोबत रहायला त्याच्या घरी गेली. यामुळे त्याच्या संसारात वादळ निर्माण झालं. कारण दोघींना नवरा हवा होता. पण त्यांना एकत्र रहायच नव्हतं. त्यावरुन पुन्हा वाद झाला. त्याची दुसरी बायको नवऱ्याला सोडून उज्जैन येथे आपल्या माहेरी निघून गेली.
न्यायालयाचा आदेश काय?
त्या व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीने परामर्श केंद्रात तक्रार दाखल केली होती. पती सोबत राहण्यासाठी तिने ही तक्रार केली होती. परामर्श केंद्राने त्या व्यक्तीला आणि त्याच्या दोन्ही बायकांना बोलवून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही बायका ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. अखेर परिवार परामर्श न्यायालयाने एक निर्णय दिला. त्यामध्ये पतीला पहिले 15 दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि नंतरचे 15 दिवस दुसऱ्या पत्नी सोबत रहाण्याचा आदेश दिला.