पालघर : वसई पूर्वेच्या मधूबन परिसरात बिल्डरने खोदून ठेवलेल्या खड्यात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. करण तिवारी (वय16) असं बुडालेल्या मुलाचे नाव आहे. तो नालासोपारा पूर्वेतील शिर्डी नगर येथील रहिवासी होता. करण तिवारी त्याच्या 8 ते 10 मित्रांसोबत आज (5 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास नालासोपाऱ्याच्या शिर्डी नगर येथून वसईच्या मधूबन परिसरात फिरण्यासाठी आला होता.
मधूबन परिसरात बिल्डरने बिल्डिंग कंट्रक्शनसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. त्याच पाण्यात मुलांचा ग्रुप पोहण्यासाठी उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने यात एकाचा बुडून मृत्यू झाला. तर इतर मुलं सुखरुप बाहेर आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
संबंधित घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर वेळेचा विलंब न करता वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शोध मोहिम सुरु करत मुलाचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेची माहिती मृतकांच्या कुटुंबियांना सांगण्यात आली आहे. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बिल्डरवर निशाणा साधला आहे.
वसईच्या मधुबन परिसरामध्ये मोठमोठे कंट्रक्शन सुरु आहेत. पण बिल्डरांकडून त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपायोजना राबवल्या जात नसल्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. अशा बिल्डरांवर तात्काळ कारवाही करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा : भारतातील अपहरणाची ‘ती’ भयानक घटना ज्याने संपूर्ण देश हादरला होता