Mumbai Fraud : गोरेगावमध्ये निवृत्त कर्मचाऱ्याची 22 लाखांची फसवणूक, गूगल पे वरुन चोरट्यांनी पैसे लांबवले

| Updated on: Jul 19, 2022 | 6:16 PM

प्रकाश नाईक एक दिवस बँकेमध्ये अकाउंटबद्दल माहिती घ्यायला गेले तेव्हा बँकेकडून त्यांना अकाउंटबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी थेट दिंडोशी पोलीस स्टेशन गाठत फसवणुकीची तक्रार दाखल केली.

Mumbai Fraud : गोरेगावमध्ये निवृत्त कर्मचाऱ्याची 22 लाखांची फसवणूक, गूगल पे वरुन चोरट्यांनी पैसे लांबवले
गोरेगावमध्ये निवृत्त कर्मचाऱ्याची 22 लाखांची फसवणूक
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : गूगल पे (Google Pay) च्या माध्यमातून एका निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याची 22 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना गोरेगावमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकाश नाईक असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शुभम तिवारी (22) आणि अमर गुप्ता (28) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. दिंडोशी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक (Arrest) केली आहे. मॉर्निंग वॉकमुळे नाईक यांची या आरोपींशी ओळख झाली होती. हे तरुण गेम खेळण्यासाठी रोज नाईक यांचा मोबाईल मागायचे आणि गूगल पे वरुन पैसे ट्रान्सफर करुन घ्यायचे. नाईक यांना कळून नये म्हणून अकाऊंटमधून पैसे कट झाल्याचा मॅसेज मोबाईलमधून डिलिट करायचे आणि मोबाईल परत करायचे.

मॉर्निंग वॉक दरम्यान पीडित व्यक्तीची आरोपींशी ओळख

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेमध्ये राहणारे प्रकाश नाईक काही महिन्यांपूर्वी बेस्टमधून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना बेस्ट प्रशासनाकडून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 22 लाख रुपये मिळाले होते. नाईक निवृत्तीनंतर गोरेगावमध्ये असलेला बेस्टच्या दिंडोशी बस डेपो जवळ दररोज फिरण्यासाठी जायचे. त्याच ठिकाणी त्यांची दोन अनोळखी तरुणांशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर हे दोघे तरुण नाईक यांचा मोबाईल गेम खेळण्यासाठी मागून घ्यायचे. मोबाईलमध्ये गुगल पे ॲप्लिकेशन डाउनलोड करून नाईक यांच्या अकाऊंटमधून तब्बल दोन महिन्यात 22 लाख रुपये आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले.

गेम खेळण्यासाठी मोबाईल घ्यायचे आणि गूगल पे वरुन पैसे ट्रान्सफर करायचे

प्रकाश नाईक एक दिवस बँकेमध्ये अकाउंटबद्दल माहिती घ्यायला गेले तेव्हा बँकेकडून त्यांना अकाउंटबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी थेट दिंडोशी पोलीस स्टेशन गाठत फसवणुकीची तक्रार दाखल केली. दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंद करून गोरेगाव परिसरामधून दोन आरोपींना अटक केले. हे आरोपी नाईक यांच्याकडून गेम खेळण्याच्या नावाखाली मोबाईल घ्यायचे. त्यानंतर गुगल पे मधून आपल्या अकाउंटमध्ये पैसे घ्यायचं आणि पैसे कट झाल्याचा मॅसेज आल्यानंतर तो मेसेज डिलीट करून त्यांना पुन्हा मोबाईल द्यायचे. या आरोपींनी आणखी काही लोकांची अशा पद्धतीचे फसवणूक केली आहे का या संदर्भात अधिक तपास दिंडोशी पोलीस करत आहेत. (22 lakh fraud of a retired best employee from Google Pay in Goregaon)

हे सुद्धा वाचा