मुंबई : पत्नीने गावी जाण्यास नकार दिला म्हणून माथेफिरु पतीने चाकूने हल्ला (Knife Attack) केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. सोमोर कोनय (32) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर आदिनाबीबी शेख (31) असे हल्ला करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पतीला पोलिसांनी अटक (Arrest) केले आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी (Injured) झाली असून, तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पतीच्या गावात रोजगाराचे साधन नसल्याने महिला मुंबईत कामाच्या शोधात आली होती. त्यानंतर पती तिच्या शोधात मुंबईत आला.
आरोपी सोमोर हा मूळचा पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. पीडित महिला आरोपीची दुसरी पत्नी आहे. यावर्षीच दोघांचे लग्न झाले. दोघांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला होता. त्यामुळे पत्नी 28 जुलै रोजी कामधंदा करण्यासाठी मुंबईत आपल्या नातेवाईकांकडे आली. सोमोरच्या गावात काही कामधंदा उपलब्ध नसल्याने आदिनाबीबी ही नोकरीसाठी मुंबईत आली होती. सध्या जोगेश्वरी पश्चिमेला बेहराम बाग येथे तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. सोमोर पत्नीच्या शोधात 1 ऑगस्ट रोजी मुंबईत आला. त्यानंतर तो पत्नीला गावी परत येण्यासाठी सांगत होता. मात्र पत्नी गावी जाण्यासाठी तयार नव्हती. पत्नीला मुंबईत कामधंदा करुन पैसे कमवायचे होते.
पत्नी गावी येण्यास तयार नसल्याने संतापलेल्या पतीने खिशातून चाकू काढला आणि पत्नीच्या गळ्यावर वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात टाकून पतीने तेथून पळ काढला. महिलेला तात्काळ कूपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर आहे. यानंतर पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पतीला अटक केले आहे, असे आंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी सांगितले. पत्नीला भेटायला जाण्यापूर्वी आरोपीने चाकू विकत घेतला होता. (A husband attacked his wife with a knife in Andheri after she refused to come to the village)