मुंबई : गेल्या काही वर्षात फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. अनेकदा आपल्याला कळत देखील नाही की नेमकं काय झालं आहे. फसवणूक करणारे लोकं इतके हुशार आहेत, की शिकल्या सवरल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. असे प्रकार दिवसागणिक वाढतच आहेत. स्कॅमर्स पहिल्यांदा सावज हेरतात आणि टप्प्यात आला की बरोबर कार्यक्रम करून टाकतात. असाच काहीसा प्रकार पालघर जिल्ह्यातील विरार येथे राहणाऱ्या डॉक्टरसोबत झाला आहे. डॉक्टरला टेलिग्रामवर Hafiz@094 नावाच्या युजर्सकडून चित्रपटासाठी ऑनलाईन रेटिंग देण्याच्या बदल्यात कमाई करण्याचा पर्याय देण्यात आला. मग काय पैशांच्या मोहात डॉक्टर पुरता वाहून गेला आणि नको तेच झालं.
एका मीडिया रिपोर्टनुसार, स्कॅमर्सने डॉक्टरला जाळ्यात ओढल्यानंतर एका चित्रपटाला 5 स्टार रेटिंग दिल्यानंतर तात्काळ खात्यात 830 रुपये जमा केले. खात्यात पैसे जमा झाल्याने डॉक्टर भलताच खूश झाला. मग काय स्कॅमरने आणखी स्किम देत सांगितलं की, जास्त पैसे कमवायचे असतील तर एक स्किम आहे. कमिशनचं नवं जाळं टाकलं. त्यासाठी काही पैसे टाकावे लागतील असं स्पष्ट केलं. हव्यासापोटी डॉक्टरने 9900 रुपये अनोळखी बँकेत ट्रान्सफर केले.
हे प्रकरण इथेच थांबल नाही डॉक्टरच्या ऑनलाइन तिकीट रेटिंग खात्यात 31 लाखांची रक्कम कमिशन म्हणून दिसू लागाली. ही रक्कम पाहून डॉक्टरची मतीच फिरली असं म्हणावं लागेल. पैसे काढण्यासाठी डॉक्टरची धावपळ सुरु झाली. पण स्कॅमरने टाकलेलं जाळं डॉक्टरच्या लक्षातच आलं नाही. 31 लाखांची रक्कम काढायची असेल तर 15 लाख डिपॉझिट करावे लागतील. असं सांगितलं आणि विश्वास जिंकत गेला.
असं करता करता कमिशन वॅल्यू 1.96 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. डॉक्टरला कमिशन मिळाल्यानंतर रकमेतून कमी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत गेला आणि डॉक्टर अडकत गेला. चित्रपटाला रेटिंग देण्याच्या बहाण्याने डॉक्टरने एकूण 1.09 कोटी रुपये जमा केला आणि फसला.
डॉक्टरला आपली फसवणूक झाल्याचं कळताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून आरोपी पळून गेल्याचं निदर्शनास आलं आहे. दुसरीकडे डॉक्टरच्या हाती काही आलं नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे तुम्हालाही जॉब ऑफर किंवा पार्ट टाईम कमाईची ऑफर आली तर सावध राहा. तुम्हीही अशाच प्रकारे जाळ्यात अडकू शकता.