मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी किला कोर्टाने पुन्हा एकदा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता आर्यनसह इतर आरोपींची आता थेट जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे. आर्यनसह इतर आरोपींनी जामीन मिळावा यासाठी त्यांचे वकील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करु शकतात. पण आरोपींना नेमका जामीन कधी मिळेल? ते अद्याप अनिश्चित आहे. याच माहितीसाठी आम्ही ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियानुसार आर्यनसह इतर आठ आरोपींना पुढचे दोन-तीन दिवस जेलमध्येच राहावे लागू शकतं. तसेच एनसीबी आर्यनच्या कस्टडीसाठी पुन्हा कोर्टात दावा करु शकते, असंही निकम यांनी सांगितलं.
“आर्यन खान आणि इतर आरोपींच्या जामीनाला विरोध करताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने जी समग्र कारणं दिली होती ती कारणं किला कोर्टाला पटलेली आहेत. त्यामुळे जामीन नाकारण्यात आला आहे. अर्थात मॅजिस्ट्रेटची डिटेल ऑर्डर अद्याप बाहेर आलेली नाही. त्यामुळे कोणत्या कारणामुळे आरोपींचा जामीन अर्ज नाकारला आहे ते समोर येईल. आरोपींना जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात आव्हान देण्याचं त्यांना कायद्याने पूर्ण अधिकार आहे. ऑर्डर मिळाल्यानंतरच पुढचं सांगता येईल. आज सांगता येणार नाही. सत्र न्यायालयात केव्हा अपील दाखल केलं जाईल त्याला चॅलेंज केलं जाईल हे न्यायदंडाधिकाऱ्याची ऑर्डर आल्यानंतरच सांगता येईल”, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.
“साधारणपणे या संपूर्ण प्रक्रियेला पुढचे दोन-तीन दिवस तरी लागण्याची शक्यता आहे. कारण आरोपींना सर्टिफाईड कॉपी मिळवावी लागेल. ती कॉपी मिळाल्यानंतर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करावा लागेल. त्यावर सरकारी पक्षाचं म्हणणं म्हणजेच एनसीबीचं म्हणणं मागितलं जाईल. त्यानंतरच सत्र न्यायालय यावर निर्णय घेऊ शकतं. आता या प्रक्रियेला दोन ते तीन दिवस सहज लागण्याची शक्यता आहे”, असं निकम यांनी सांगितलं.
“प्रत्येक केस ही त्या तपासाच्या गुणवत्तेवर आधारीत असते. अमूक खटल्यात जामीन मिळाला म्हणजे या खटल्यातही जामीन मिळाला पाहिजे, असं म्हणता येणार नाही. त्यामुळे आर्यन खान जवळ ड्रग्ज सापडले होते का ते किती होते, त्याने कुठून मिळवले या सगळ्यांचा खुलासा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या ऑर्डरमध्ये येऊ शकतो. याशिवाय एनसीबीने कोठडी मागितली होती पण त्यांना मिळाली नाही. पण एनसीबी पुन्हा कस्टडी मिळण्यासाठी अर्ज करु शकते. अर्थात त्यांच्याजवळ मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर ते अवलंबून राहील”, असं निकम यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
शाहरुखला तिसऱ्यांदा धक्का, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी !