बदलापूरच्या आंदोलनानंतर अफवांचे पीक, आक्रमक पोलिसांची धडक कारवाई, चौघांवर गुन्हे दाखल, तरुणीला अटक

| Updated on: Aug 25, 2024 | 10:47 AM

Mumbai Crime News: दोन दिवसांपूर्वी, बदलापूरमधील अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीबद्दल खोटी माहिती पसरवणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोस्ट टाकल्याबद्दल २१ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. ठाणे सायबर सेलने तिचा शोध घेत तिच्यावर कारवाई केली.

बदलापूरच्या आंदोलनानंतर अफवांचे पीक, आक्रमक पोलिसांची धडक कारवाई, चौघांवर गुन्हे दाखल, तरुणीला अटक
बदलापूर अत्याचार प्रकरणी मंगळवारी आंदोलन करण्यात आले होते.
Image Credit source: tv9
Follow us on

ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात मंगळवारी मोठे जनआंदोलन उभारले गेले होते. बदलापुरातील एका नामांकीत शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात तब्बल नऊ तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर बदलापूर शहरात सध्या अफवांचा सुळसुळाट सुरू असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर खोट्या पोस्ट टाकून अफवा पसरवल्या जात आहेत. अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांकडून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. समाजमाध्यमांवर खोटी पोस्ट व्हायरल केल्याबद्दल चार जणांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच या प्रकरणात एका तरुणीला अटक केली आहे.

आतापर्यंत पाच गुन्हे दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या चार आरोपींनी बदलापुरातील घटनेशी संबंधित खोटी माहिती इंस्टाग्रामवर व्हायरल केली होती. त्यांनी पीडित कुटुंबाबद्दल धक्कादायक आणि खोटी माहिती पसरवली होती. यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी, बदलापूरमधील अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीबद्दल खोटी माहिती पसरवणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोस्ट टाकल्याबद्दल २१ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. ठाणे सायबर सेलने तिचा शोध घेत तिच्यावर कारवाई केली.

हे सुद्धा वाचा

बदलापुरात आंदोलनानंतर तणावपूर्ण शांतता

बदलापूर शहरात आंदोलनानंतर तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, अफवांमुळे शहरात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांनी करडी नजर सोशल मीडियावर ठेवली आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे.

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी बंद पुकारला होता. परंतु उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरवल्यामुळे मूक आंदोलन केले. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी झाले होते.