मुंबई : भोजपुरी सिनेमा(Bhojpuri Actress)मध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीनं आत्महत्या (Suicide) केली असून तिला काही बोगस एनसीबी अधिकारी (Fake NCB official) खंडणीसाठी धमकावत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. मात्र या घटनेनंतर शहरात बोगस एनसीबी अधिकाऱ्यांची टोळी तर सक्रिय नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उकळत होते खंडणी
जोगेश्वरी पश्चिममध्ये राहणाऱ्या एका 28 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीनं गुरुवारी आत्महत्या केल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीप्रमाणे काही लोक स्वतःला एनसीबी अधिकारी असल्याचं सांगत कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचं समोर आलंय. या टोळीच्या त्रासाला कंटाळून या अभिनेत्रीनं आत्महत्या केली. जोगेश्वरी पश्चिममधल्या कॅप्टन सामंत मार्गावरच्या सत्यम को-आप हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या या तरूणीनं गळफास घेतला.
कारवाई न करण्याच्या बदल्यात खंडणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 20 लाखांची खंडणी तिच्याकडे मागितल्याचं समोर आल्यानंतर अंबोली पोलिसांनी ह्या प्रकरणात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली. ही अभिनेत्री एका पार्टीमध्ये गेली असता काहीजण स्वतःला एनसीबी अधिकारी म्हणून कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात 20 लाख रुपये खंडणी मागत होते. मात्र भीती आणि बदनामी होईल, असा विचार करून तिनं आत्महत्या केली.
दोघांना अटक
या प्रकरणी अंबोली पोलिसांनी भा. दं. वि. कलम 306, 170, 420, 344, 388, 389, 506, 120(ब)अंतर्गत तोतया एनसीबी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सूरज व प्रवीण नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.’