मुंबई : गुन्हेगार फसवणुकीसाठी कोणता मार्ग अवलंबतील याचा नेम नाही. बोरीवली पोलिसांनी एक असा गुन्हा उघडकीस आणला आहे, जे ऐकल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावतील. सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी आरोपी चक्क आपले बँक खाते भाड्याने देत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरोपी 10 टक्के कमिशन द्यायच्या अटीवर सायबर गुन्हेगारांना आपले बँक खाते भाड्याने द्यायचे. बोरीवली जीआरपी पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दोघेही आरोपी मुंबईतील गोरेगाव आणि धारावी परिसरातील असून, पेशाने रिक्षाचालक आहेत.
दोन्ही आरोपी मूळचे झारखंडमधील जामतारा येथील रहिवासी आहेत. एक गोरेगाव येथे रिक्षाचालक चालवतो तर दुसरा धारावी येथे रिक्षा चालवतो. दोन्ही आरोपींची वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती आहेत. एका आरोपीची 20 खाती तर दुसऱ्याची 30 बँक खाती आहेत. दोघेही 10 टक्के कमिशनवर आपली खाती सायबर गुन्हेगारांना भाड्याने द्यायचे.
बोरिवली जीआरपीकडे एक ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये तक्रारदाराच्या मोबाईलवर एक एसएमएस आला होता, ज्यामध्ये बँकेचे केवायसी अपडेट करण्याचे लिहिले होते.
तक्रारदाराने त्या लिंकवर क्लिक करून बँकेचा सर्व डेटा भरल्यानंतर काही वेळाने या गुन्हेगारांनी तक्रारदाराच्या खात्यातून 40 हजार रुपये आपल्या खात्यात वळते केले.
बोरिवली जीआरपीने या घटनेचा तपास सुरु केला असता तक्रारदाराचे पैसे ज्या खात्यात गेले त्या खात्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. धारावीतून एकाला आणि गोरेगाव येथून दुसऱ्याला अटक केले.