मुंबई : ऑनलाईन साईटवरून लग्न करताय? तर मग सावध राहा. कारण मुंबईत एक बोगस नवरी वावरत आहे. ती नवरी म्हणून येते, लग्न करते आणि हनीमून आधीच घबाड घेऊन पोबारा करतेय. मालाडमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली असून या नवरीने मुंबई पोलिसांनाच कामाला लावले आहे. ही तरुणी लग्नासाठी ड्युप्लिकेट नाव वापरत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ती ड्युप्लिकेट नाव वापरत असल्याने तिला पकडणं पोलिसांना कठीण होऊन बसलं आहे. एकीकडे मालाड पोलीस या प्रकरणी लुटमार करणाऱ्या या बोगस वधूचा शोध घेत आहेत, तर दुसरीकडे लग्न लावणाऱ्या एजंटला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
आशा गायकवाड असे या नवरीचे नाव असून ती 30 वर्षाची आहे. ती गुजरातची रहिवासी आहे. तिचं हे नाव सुद्धा खरं आहे की नाही याचा शोध सुरू आहे. तिने एका 28 वर्षीय तरुणाशी विवाह केला होता. हा तरुण मालाडमध्ये राहतो. तो खासगी नोकरी करतो. त्याचे वडील डॉक्टर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण तोतरा आहे. त्याला बोलण्यात अडचण असल्यामुळे त्याचे लग्न होत नव्हते. लग्न करण्यासाठी त्याने अनेक ऑनलाइन मॅरेज वेबसाइट्सवर त्याचे प्रोफाईल टाकले होते. तसेच लग्न जुळवणाऱ्या एजंटलाही तो भेटला होता. एका एजंटने त्याला त्याचे लग्न जुळवून देण्याचे आश्वासनही दिलं होतं.
त्यानुसार 29 मार्च 2022 रोजी दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर कोर्ट मॅरेज झाले. कोर्ट मॅरेज करताना एजंटने या नवरीला आई-वडील नसल्याचं सांगितलं. तसेच या मुलीची मावशीच तिची काळजी घेत असल्याचंही सांगितलं. मुलीची तिच्या मावशीने काळजी घेतली आहे. त्यामुळे मावशीला दीड लाख रुपये द्यावे लागतील, तेव्हाच तिची मावशी मुलीला सासरी पाठवेल, असंही एजंटने तरुणाच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. त्यावर सध्या आमच्याकडे इतके पैसे नाहीत, असं सांगून तरुणाच्या कुटुंबीयांनी एजंटला 20000 रुपये दिले आणि उर्वरित पैसे नंतर देणार असल्याचं सांगितलं.
लग्नाच्या दुसर्या दिवशी दोघांनी हनिमूनचा प्लॅन केला होता. पण हा तरुण कामानिमित्त घराबाहेर जाऊ लागला. तेव्हा आम्हालाही हनिमूनसाठी बाहेर शॉपिंग करायचे आहे, त्यामुळे बाहेर जावे लागेल, असं नववधूने कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर नववधूने दीड लाख रुपये घरात ठेवले आणि चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.
कमलेश कदम आणि आणखी एका एजंटने या दोघांचं लग्न लावून दिलं होतं. दुसरा एजंट नवरीकडचा आहे. लग्न जुळवून देण्यासाठी कमलेशने वराकडून सुमारे 15 हजार रुपये कमिशन घेतले होते. मालाड पोलिसांनी तक्रार नोंदवून लग्नाचे फोटो आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे लग्न लावणाऱ्या कमलेश कदम या एजंटला अटक केली आहे. आपल्याला मुलीबद्दल फारशी माहिती नाही. या तरुणाला लग्न करायचे होते. त्याला नवरी दाखवली. दोघांचेही लग्न लावून दिले आणि आपले कमिशन घेतले, असं कमलेशने पोलिसांना सांगितलं.
पोलिसांनी या नवरीच्या मावशीचाही शोध घेतला. तिच्याकडूनही माहिती घेतली. त्यावेळी मावशीकडून धक्कादायक माहिती समोर आली. एजंटने लग्नाचे नाटक करायला सांगितलं होतं. खोटं नाटक करायचं होतं म्हणून मुलगी लग्नाला तयार झाली. खोटं लग्न करायच्या बदल्यात एजंटने आम्हाला पैसे देण्याचे आश्वासन दिलं होतं, असं मुलीच्या मावशीने सांगितलं. तसेच या मुलीचं आधीच एक लग्न झालेलं आहे. तिला दोन मुलं आहेत. मुलाचा सांभाळ करण्यासाठी चार पैशाची गरज होती. म्हणून तिने लग्न केलं. एजंटच्या सांगण्यावरूनच बनावट लग्न केल्याचंही मुलीच्या मावशीने पोलिसांना सांगितलं.
नवरीने किती लग्न केले आहेत हे तिला अटक केल्यानंतरच कळेल. तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही. वधू लग्नासाठी तिचे डुप्लिकेट नाव वापरायची. तिचे खरे नाव वेगळेच आहे. त्यामुळे पोलिसांना तिचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत, असं मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जाधव यांनी सांगितलं.