मुंबई : मुंबईच्या अंधेरीत एका कारचालकाने पोलिसाला फरफटत नेल्याची घटना ताजी असताना आता मुंबईच्या लोअर परळ भागातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत एका कारचालकाच्या रॅश ड्रायव्हिंगने दोघांचा बळी घेतला आहे. तसेच या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संबंधित घटना ही बुधवारी (29 सप्टेंबर) रात्री लोअर परळच्या पश्चिमेकडील ब्रिजवर घडली. कारचालकाने कार सुरु असताना अचानक तितक्याच वेगाने ब्रिजवरुन युटर्न घेतला. यावेळी दुचाकीवर असलेल्या दोन निष्पांचा बळी गेला. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 25 वर्षीय कृष्णा कुर्हाडकर याचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर कारचालक पळून गेला. पण संबंधित घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे. या घटनेप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण घटनेला बरेच तास उलटून गेल्यानंतरही आरोपी फरार आहेत. या घटनेत दगावलेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांकडून तपासात हयगय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. हा सीसीटीव्ही फुटेज खरच थरकाप उडवणारा असा आहे. लोअर परळच्या पश्चिमेकडील ब्रिज हा रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे सुरु होता. गाड्यांची ये-जा सुरु होती. यावेळी एक भरधाव वेगात असलेली कारने आपली गती अचानक कमी करत युटर्न घेतला. यावेळी समोरुन एक दुचाकी वेगाने येत होती. कारचालकाने अचानक यूटर्न घेतल्याने दुचाकीचालक तरुण गोंधळात पडला. त्याने बाजूने दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण कारच्या मागचा भाग त्याला लागला. त्यामुळे तरुण थेट दुचाकीसह सरपटत पुढे गेला.
यावेळी त्याच्यासमोरुन येणारा दुचाकीचालक गोंधळात आला. त्याने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातच तो सुद्धा दुचाकीसह खाली पडला. यावेळी कारचालक थांबला नाही. त्याने कार युटर्न घेतली आणि तो पळून गेला. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारची नंबरप्लेट स्पष्टपणे दिसत नाहीय. त्यामुळे त्या कारचालकाला शोधणं हे पोलिसांपुढे मोठं आव्हान ठरलं आहे.
हेही वाचा :
VIDEO : पैशांचा माज, कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईतील धक्कादायक घटना
ज्यांच्या सहीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या त्या कैलाश गायकवाड यांची ईडीकडून चौकशी