मुंबई : मुलुंडमध्ये आज एका खाजगी इमारतीचे सिलिंग (Ceiling) तुटून वृद्ध दाम्पत्याच्या अंगावर कोसळल्याची दुर्घटना (Incident) घडली. या दुर्घटनेत वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिलिंग कोसळण्याची सुरुवात होताच आसपासच्या लोकांनी इमारतीच्या दिशेने धाव घेतली. मात्र वृद्ध दाम्पत्य जागेवरून पळू शकले नाही. त्यातच दोघांना प्राण गमवावा लागला. इमारतीतील रहिवाशांना घरे खाली करण्याबाबत मुंबई महापालिकेकडून कलम 351 ची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या नोटिशीनंतरही वृद्ध दाम्पत्य या धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करून होते, असे सांगितले जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि बृहन्मुंबई महापालिकेचे पथक दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. आज (सोमवारी) सायंकाळी 7 वाजून 46 मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने कळवले आहे.
मुलुंड पूर्वेकडील नाने पाडा परिसरातील मोती छाया या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचा भाग कोसळल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने बृहन्मुंबई महापालिकेच्या 1916 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला. मात्र सिलिंगचा मोठा भाग अंगावर कोसळल्यामुळे वृद्ध दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच दोघांची प्राणज्योत मालवली. देवशंकर नाथालाल शुक्ला (93) आणि त्यांची पत्नी अर्खीबेन देवशंकर शुक्ला (87) अशी मृत वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुर्घटना घडून पती-पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्घटना घडलेल्या या इमारतीचे (तळमजला व दोन मजले) बांधकाम 20 ते 25 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयाद्वारे या इमारतीला 351 ची नोटीस बजावण्यात आली होती.
पावसाळ्यात इमारतीच्या दुर्घटना घडण्याचे सत्र दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरु राहिले आहे. अनेक ठिकाणी बांधकामांमध्ये बेकायदेशीरपणे बदल केले जातात. ते बदल कालांतराने नागरिकांच्या जीवावर बेततात. मुलुंडमधील इमारत बांधकामदेखील अशाच प्रकारे निष्पाप वृद्ध दाम्पत्याच्या बळीला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी नेमका हलगर्जीपणा कोणी केला? नोटीस बजावण्यात आल्यानंतरही वृद्ध दाम्पत्याला सुरक्षित स्थळी का हलवण्यात आले नाही? यामागे जबाबदार कोण? याचा अधिक तपास केला जात आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. (Ceiling of private building collapses in Mulund; Unfortunate death of an elderly couple)