मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने मालाडमध्ये छोटा राजनच्या फोटोचे बॅनर्सही लावण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंडरवर्ल्ड डॉनच्या वाढदिवसाचे बॅनर्स लागल्याने पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हे बॅनर्स काढून टाकले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांची अधिक चौकशी करत आहेत.
छोटा राजनचा काल 13 जानेवारी रोजी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने मालाड पूर्व गणेश मैदान तानाजी नगर, कुरार व्हिलेज येथे छोटा राजनच्या (नाना) वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कबड्डी स्पर्धा आज शनिवार 14 आणि 15 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी परिसरात एक बॅनरही लावण्यात आला असून त्यावर छोटा राजन हा आधारस्तंभ दाखवण्यात आला आहे.
मालाडमध्ये हे बॅनर लागताच ते सर्वत्र व्हायरल होत आहे. सीआर सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हे बॅनर लावले आहे. पोस्टर व्हायरल झाल्यानंतर कुरार पोलिसांनी कारवाई केली आणि पोलिसांनी बॅनर तात्काळ हटवला. बॅनरमध्ये असलेल्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित लोकांची पोलिस चौकशी करत आहेत.
2020मध्येही छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी काही लोकांवर गुन्हाही दाखल केला होता. या लोकांनी ठाण्यात दोन ठिकाणी बॅनर लावले होते.
गेल्या वर्षी डबल मर्डर केसमध्ये मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टाने छोटा राजनसहीत चार लोकांची निर्दोष मुक्तता केली होती. 2010मध्ये छोटा शकील गँगच्या आसिफ दधी उर्फ छोटे मियाँ आणि शकील मोदक यांना गोळी मारण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याचा छोटा राजनवर आरोप ठेवण्यात आला होता.
याशिवाय मोहम्मद अली जान, प्रणय राणे आणि उम्मेदी हे सुद्धा या प्रकरणात आरोपी होते. मात्र, यांच्यावरील गुन्हा कोर्टात सिद्ध होऊ शकला नाही. हत्याकांडावेळी वापरण्यात आलेले शस्त्र आणि काडतूसे जुळून आली नाही. पुराव्यांचा अभाव आणि आरोपींची ओळख पटण्यात आलेलं अपयश यामुळे या आरोपींना सोडून देण्यात आलं. ते 12 वर्ष तुरुंगात होते.