भाईंदर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर सगळ्यांचंच बारीक लक्ष आहे. अशातच आता तर एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला अटक करण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांना अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. पण अटक करण्यात आलेली व्यक्ती एकनाथ शिंदे यांचा पुतण्या नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिलीय. क्राईम ब्रांच (Crime News) पोलिसांनी महेश शिंदे यांच्यावर अटकेची कारवाई केली. विशेष म्हणजे आधी चौकशी करुन महेश शिंदे (Mahesh Shinde arrest) यांना सोडून देण्यात आलं होतं. पण नंतर याप्रकरणी चर्चा आणि कुजबूज वाढल्याचं लक्षात आल्यानंतर पुन्हा रात्री उशिरा पोलिसांनी महेश शिंदे यांना ताब्यात घेत अटक केली, असाही दावा करण्यात आला होता. पण महेश शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्या आडनावातील समानतेमुळे चर्चांना उधाण आलंय. अखेर याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती देत, महेश शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय.
शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांना काल रात्री गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी काशीमीराच्या हटकेश संकुलातून जीसीसी क्लबमध्ये जुगार खेळताना ताब्यात घेतले. महेश शिंदे स्वतःला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतणे सांगतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे अनेक फोटो आहेत. महेश शिंदेसह चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
एकनाथ शिंदे आणि महेश शिंदे यांच्या आडनावातील साधर्म्यामुळे महेश हा स्वतःला एकनाथ शिंदे यांचा पुतण्या असल्याची बतावणी करत होता. पण अखेर पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला आहे. महेश शिंदे याचे एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे अनेक फोटोही एकत्र असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे खरंच हा एकनाथ शिंदे यांचा पुतण्या आहे की काय, यावरुन चर्चांना उधाण आलं होतं. पण अखेर पोलीस तपासात महेश शिंदे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जातेय.