मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : गेल्या पाच दिवसांपासून राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. अनेक महत्त्वाच्या गणपती मंडळाच्या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी तास न् तास रांगा लागत आहे. बाप्पासाठी करण्यात आलेली रोशनाई पाहण्यासाठी लोक रात्रभर गणेश मंडळांना भेटी देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कुटुंबकबिल्यासह भाविक बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. मुंबईत तर अनेक भागात गर्दीच गर्दी दिसत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. लालबागच्या राजाच्या मंडपात गर्दीत भाविकांना हटवताना फ्रिस्टाईल हाणामारी झाल्याचंही दिसून आलं आहे. आता तर थेट लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
लालबागचा राजाला प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडे लालबागचा राजा मंडळाविरोधात तक्रार करण्यात आली आहे. वकील आशिष राय आणि पंकज मिश्रायांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीत भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाविकांमध्ये बाचाबाची झाल्याच्या पार्श्वभूमीचाही त्यात उल्लेख करण्यात आला आहे. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लालबागमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. मंडपात पाय ठेवायला जागा नाही. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. या गर्दीत महिला, वृद्ध आणि लहान मुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या वृद्ध, लहान मुलं आणि महिलांना मनस्ताप सोसावा लागत आहे, असं या तक्रारीत म्हटलं आहे.
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आलेल्या व्हीव्हीआयपींना विशेष व्यवस्था केली जात आहे. त्यांना कोणत्याही दर्शन रांगे शिवाय दर्शन दिलं जात आहे. स्वत: पदाधिकारीच या व्हीव्हीआयपींची सरबराई करताना दिसत आहेत. मात्र, बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या वृद्ध, लहान मुलं आणि महिलांसाठी काहीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे हे लोक खूप लांबून येतात. तरीही त्यांच्यासाठी वेगळी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आलेली नाही, याकडे या तक्रारीत लक्ष वेधण्यात आलं आहे. तसेच याकडे लक्ष देण्याची विनंतीही केली आहे. तक्रारदार दोघेही वकील आहेत. त्यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्याने लालबागचा राजा येथील व्हीव्हीआयपीच्या दर्शनाला चाप बसणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिलेला रांगेत उभं असताना मंडपातच भोवळ आली आहे. या महिलेला भाविकांनी तात्काळ बाजूला नेलं. तिला वारा घातला आणि तिच्या तोंडावर पाणी मारलं.