मुंबई : दहिसर (Dahisar Crime News) पूर्व इथं हायवेवर एका बेस्ट बसवर (Dahisar Best Bus) दगडफेक करण्यात आली. सोमवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये बसचं मोठं नुकसान झालं. बेस्ट बसच्या काचा दगडफेकीत फुटल्या. महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांनी (Best Bus Passengers) खचाखच भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचीही एकच घाबरगुंडी उडाली. या घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. तर बेस्ट बसमधील काही प्रवासी या दगडफेकीत जखमी झाल्याचंही कळतंय.
मुंबईतील दहिसर पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पायल हॉटेल आहे. या हॉटेलजवळ बेस्ट बसची एका कारला किरकोळ धडक बसली. त्यातून गाडीतील लोकांनी आपल्या साथीदारांना बोलवलं आणि भर रस्त्यात बसवर दगडफेक केली.
ज्या बसवर ही दगडफेक करण्यात आली, ती बस दहिसर चेक नाक्याकडे जात होती. त्यावेळी बेस्ट बस आणि कारचा किरकोळ अपघात झाला. अपघातातून झालेल्या बाचाबाचीनंतर ही दगडफेक करण्यात आली. कारमधील प्रवाशांनी आपल्या साथीदारांना बोलावून बसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. यात अनेक प्रवासी जखमीही झाले.
दहिसरमध्ये झालेल्या या दगडफेकीच्या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यात आता या घटनेची पोलिसांनीही गंभीर दखल घेतलीय. सध्या दगडफेकीबाबत स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय.
दगडफेक कऱण्यात आलेली बस 705 क्रमांकाची होती. दगडफेकीमध्ये बसचं मोठं नुकसान झालं. बसच्या खिडकीच्या काचा दगडफेकीमध्ये फुटल्या. तर बसच्या समोरील काचेचंही दगडफेकीमध्ये प्रचंड मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. या दगडफेकीदरम्यान, बेस्ट मधील प्रवासी प्रचंड धास्तावले होते.