मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर विक्रोळी गाधीनगर येथे उड्डानपुलावरुन पेव्हर ब्लॉक कोसळल्याने एकच खळबळ माजली. पेव्हर ब्लॉक पडल्याने वाहन चालकांना वाटले पूल कोसळला, म्हणून सर्व वाहनचालक आपल्या गाड्या सोडून पळाले. मात्र नंतर जवळ जाऊन पाहिले असता तो पेव्हर ब्लॉक होता. यानंतर वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आज दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर विक्रोळी गांधीनगर सिग्नलला दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास सिग्नल लागला म्हणून सर्व गाड्या उभ्या होत्या. इतक्यात वरुन पुलावरुन एक पेव्हर ब्लॉक दोन कारवर पडला.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे सिग्नलवर उभे असलेल्या वाहन चालकांमध्ये एकच गोंधळ माजला. वाहन चालकांना वाटले पूलच कोसळतोय. यामुळे घाबरलेले वाहन चालक जीव वाचवण्यासाठी आपल्या गाड्या सोडून पळू लागले.
नंतर जवळ जाऊन पाहिले तेव्हा पेव्हर ब्लॉक असल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र दोन कारच्या काचा फुटल्या. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.