मुंबई : टीव्ही मालिकेतून प्रेरणा घेत पुजार्याच्या वेशात जैन मंदिरात जाऊन पूजेच्या बहाण्याने मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. सोन्या-चांदीच्या ताट आणि प्रसादाची चोरी करणार्या अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्राईम पेट्रोल पाहून स्वत:ला वाचवण्यासाठी तो जैन समाजाचा वेश घेऊन, तोंडाला मास्क लावून आधी रेकी करत असे. जैन मंदिरात पूजा करून नंतर मंदिरात ठेवलेले सोने-चांदीची पूजा करून तो माल चोरून पळून जायचा आणि चोरीचा माल विकून मिळालेल्या पैशातून जुगार खेळायचा. भरत सुखराज दोशी असे अटक करण्यात चोरट्याचे नाव आहे.
दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दररोज तीन ते चार मंदिरात पूजेच्या बहाण्याने जात असे आणि संधी मिळेल तेव्हा तेथून वस्तू चोरून नेत असे. एका जैन मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुजाऱ्याने दिंडोशी पोलिसात तक्रार दिली होती.
पुजाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. अटक केलेल्या चोरट्याकडून चोरीची सोन्याची भांडी आणि काही वस्तू जप्त केल्या आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 5 लाख 30 हजार आहे.
मालाड येथील एका जैन मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या व्हिडीओमध्ये आरोपी जैन धर्माच्या वेशात मंदिरात पूजा करण्यासाठी आला. काही वेळ इकडे-तिकडे पाहिल्यानंतर आरोपीने तेथे उपस्थित असलेल्या सोन्याच्या पाट्या आणि प्लेट्स चोरून नेल्या. दिंडोशी पोलिसांकडे असे अनेक फुटेज या चोराचे समोर आले आहेत.