सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 25 सप्टेंबर 2023 : आपल्या मुलांसाठी आईबाप वाटेल ते करत असतात. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राणही पणाला लावतात. त्यांचं आजारपण असो की आनंदाचे क्षण प्रत्येक क्षणात आईवडील लेकरांच्या मागे उभे राहतात. अनेक आईवडील तर आपण किती कष्ट सहन करतोय हे सुद्धा आपल्या मुलांना कळू देत नाही. हे असं असलं तरी काही आईवडील मुलांशी निष्ठूरपणे वागत असल्याचंही समोर येत असतं. डोंबिवलीतही अशाच एका निष्ठूर आणि निर्दयी बापाचं कृत्यसमोर आलं आहे. या धक्कादायक आणि अविश्वसनीय घटनेमुळे अख्खी डोंबिवलीच हादरून गेली आहे. या प्रकारावर डोंबिवलीकर संताप व्यक्त करत आहेत.
डोंबिवली पूर्वेतील माणगाव स्मशानभूमीच्या मागे हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकारामुळे माणगाव चाळीतील लोकही हादरून गेले आहेत. मनोज कुमार रामप्रसाद आग्रहारी (वय 38) याने त्याच्या गतिमंद मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोजने पोटच्या मुलीचीच हत्या केल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मनोज हा माणगाव चाळीच्या मागील एकाच चाळीत पत्नी लीलावती आणि 10 वर्षाची मुलगी लवली यांच्यासोबत राहतो. मनोज हा किराणा दुकानात काम करून कुटुंबाचं गुजराण करतो. त्याची मुलगी लवली ही जन्मापासून गतिमंद आहे. तिला बोलता आणि ऐकता येत नव्हते.
लवलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दवाखान्यात तिच्यावर उपचार करण्यात आले. पण कोणताच फायदा होत नव्हता. दवाखान्यातील खर्चामुळे मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद व्हायचा. मनोज कधी कधी प्रचंड संतापून जायचा. लवलीचा काही उपयोग नाही. तिला संपवून टाकू, अशी संतप्त विधाने मनोज करायचा, असं सूत्रांनी सांगितलं.
वडिलांच्या संतप्त स्वभावामुळे लवलीही बिथरलेली होती. ती सतत आईसोबत राहायची. आईला एकक्षणही सोडत नव्हती. लिलावतीही लवलीची प्रचंड काळजी घेत होती. पण 24 सप्टेंबर रोजी म्हणजे काल संध्याकाळी 5 च्या सुमारास काही कामानिमित्ताने लिलावती बाहेर गेली होती. त्यावेळी मनोज घरी आला. तेव्हा त्याने लवलीला घरात एकटे पाहिले अन् लवलीची गळा दाबून हत्या करून पसार झाला.
लवलीची आई जेव्हा घरी आली तेव्हा तिने मुलीला निपचित पडलेलं पाहिलं. त्यानंतर तिने आरडाओरडा केली आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशी सुरू केली. यावेळी लिलावती हिने मनोजच्या विरोधात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे डोंबिवलीकर चांगलेच हादरून गेले आहेत.
दरम्यान, कल्याणमध्ये एक हत्येचं प्रकरण उघड झालं आहे. कल्याणच्या दुर्गाडी पुलावर ट्रक चालकाची चाकू मारून हत्या करण्यात आली आहे. हा ट्रक चालक भिवंडीवरून कल्याणच्या दिशेने खडीने भरलेला ट्रक घेऊन पहाटे येत होता. यावेळी दोन आरोपींनी चाकूने हल्ला करत त्याची हत्या केली. भोलाकुमार मातोर असं ट्रक चालकाचे नाव आहे. कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.