Dombivli Crime News: राज्यात शुक्रवारी सर्वत्र धुलिवंदन साजरी करण्यात आले. रंगाचा हा उत्सवात विविध रंगांनी राज्यातील नागरिक रंगले होते. हा उत्सव साजरा करुन विश्रांती घेत असताना डोंबिवली परिसरात तुफान हाणामारी झाली. दोन गटात मोठा वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झाले. यामुळे अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. डोंबिवलीतील आयरे गावात आता तणावपूर्ण शांतता आहे.
डोंबिवलीतील आयरे गावीतील ज्योती नगर येथे रंगपंचमीच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात मोठा राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त गटाने मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला केला. यात हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा बोलवावा लागला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यावर या प्रकरणी रामनगर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांशी धक्काबुक्की करणे आणि मारहाण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाण प्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये ५ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहे. या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का? याची चौकशी सुरू आहे, असे एसीपी सुहास हेमाडे यांनी सांगितले. दोन गटात हा वाद होण्याचे कारण काय? त्याची माहिती पोलीस चौकशीनंतर समोर येणार आहे.
डोंबिवलीसह कोकणातील अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजारात 20 टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिपळूण तालुक्यातील निवळी-कोंडवाडी गावातील एका व्यावसायिकाने हा गंडा घातल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील एका गुंतवणूकदाराने विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.