कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीची धडक कारवाई सुरु आहे. ईडी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सकाळपासून तब्बल पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये देशमुख यांच्या नागपुरातील घराचा देखील समावेश आहे. तसेच ईडीने देशमुख यांच्या नागपुरात व्यावसायातील भागीदार असलेल्या व्यवसायिकाच्या घरीदेखील छापा टाकला आहे. याशिवाय मुंबईतील देशमुख यांचं शासकीय निवासस्थान असलेला ज्ञानेश्वरी बंगला, त्यांचं स्वत:चं वरळी येथील घर असलेली सुखदा इमारत तसेच त्यांचा CA राहत असलेल्या वरळी येथील घरी देखील ईडीने छापा टाकला आहे. ईडीची सकाळपासून ही कारवाई सुरु आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक अशी ही कारवाई केली जात असल्याचं निदर्शनास येत आहे. प्रत्येक छापेमारीवेळी ईडीसोबत सीआरएफ जवनांचं एक पथकही घटनास्थळी दाखल होत आहे (ED raid on five places today on Money Laundering Case against Anil Deshmukh).
1) अनिल देशमुख यांचं नागरपुरातील घर
ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते (ED raid on five places today on Money Laundering Case against Anil Deshmukh).
2) अनिल देशमुख यांच्या बिझनेस पार्टनरच्या घरी छापा
ईडीने नागपुरात आणखी एका ठिकाणी छापा टाकला. अनिल देशमुख यांच्या व्यवसायातील भागीदार असलेलेल सागर भातेवार यांच्या घरावरही ईडीने छापा टाकला. भातेवारी हे नागपुराती शिवाजी नगर येथे वास्तव्यास आहेत. तिथेदेखील ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
1) ज्ञानेश्वरी बंगला
नागपुरात ईडीची छापेमारी सुरु असताना ईडीच्या दुसऱ्या पथकांनी अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घरी देखील छापे टाकले. देशमुख सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. ईडीने देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर छापा टाकला. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगल्याचा ताबा सोडलेला नाही. विशेष म्हणजे हा बंगला वर्षा बंगल्याच्या अगदी बाजूलाच आहे. या बंगल्यात ईडीचे अधिकारी पोहोचले. तसेच सीआरपीएफ जवानांची एक टीमसुद्धा या ठिकाणी पोहोचली.
2) सुखदा इमारत
अनिल देशमुख यांचं मुबंईतील निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीतही ईडीने छापा टाकला. ईडीची सायबर फॉरेन्सिक टीमही देखील या ठिकाणी दाखल झाली होती. या अधिकाऱ्यांकडून काही महत्त्वाचा डिजीटल डेटा घेतला जाण्याची शक्यता आहे. फॉरेन्सिक टीमने देशमुख कुटुंबातील सर्वांचे मोबाईल जप्त केले आहेत. या इमारतीत अनिल देशमुख दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. तर ईडीची फॉरेन्सिक टीम दुपारी तीन वाजेच्या सुमारास या इमारतीतून बाहेर पडताना दिसली.
3) अनिल देशमुख यांच्या CA च्या घरी छापा
ईडीने अनिल देशमुख यांच्या CA च्या घरी देखील छापा टाकला आहे. त्यांच्या CA चं घर वरळी येथे आहे. तिथूनही काही महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, अशी आशा ईडी अधिकाऱ्यांना होती.
अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे यांनाही ईडीने ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केली आहे. पालांडे यांच्या चौकशीतून काही बाहेर येतं का, हे पाहणंही महत्वाचं आहे. ईडीने काही लोकांचे जबाबही नोंदवल्याची माहिती मिळतेय. त्यात डीसीपी राजीव भुजबळ आणि काही बार मालकांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
एकीकडे ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सकाळपासून छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याचं कळंतय.
दरम्यान, सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते
संबंधित बातम्या :
अनिल देशमुख यांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, काही बार मालकांचेही जबाब!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी