मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात आता गोळीबाराच्या घटनांनी थैमान घालायला सुरुवात केली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर भर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गोळीबार केला. संबंधित घटना ताजी असताना चाळीसगावात काल भाजपच्या एका माजी नगरसेवकार तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली. त्यानंतर आज चक्क महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर यावेळी गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणारे आरोपी हे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घोसाळकर बोरीवले पश्चिमेत आपल्या वॉर्डात नागरिकांच्या भेटीगाठी गेले होते. त्याचवेळी त्यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला. अज्ञात आरोपींकडून अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिषेक घोसाळकर यांना दहीसरमधील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे बडे नेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. या घटनेमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांचे विविध पथकं तपासासाठी तैनात झाले आहेत.