मुंबई: मुंबई पोलिसांना एका लुटमारीच्या प्रकरणात मोठं यश आलं आहे. दिंडोशी पोलिसांनी राजस्थानच्या कुमावत टोळीतील 5 जणांना अटक केली आहे. हे पाचहीजण मोठ्या शिताफिने व्यापाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून नंतर त्यांच्याशी संपर्क तोडून टाकायचे. त्यामुळे अनेक व्यापारी या टोळीला फसले गेले होते. या कुमावत टोळीच्या तक्रारीही पोलिसांकडे आल्या होत्या. त्यामुळे राजस्थान आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर ही टोळी आली होती. अखेर मुंबई पोलिसांनीच मोठ्या शिताफिने या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे.
ही टोळी देशातील बड्या उद्योजकांचे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे व्हॉट्सॲप डीपी ठेवत असे. त्यानंतर देशातील इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या व्यावसायिकांशी फोन करून संपर्क साधत असे. स्वत: व्यावसायिक असल्याचे ही टोळी भासवत असे. काही वेळा बड्या उद्योजकांच्या व्यवसायाच्या नावाचा वापर करून व्यापाऱ्यांना मोठ्या नफ्याची लालच दाखवत असे. त्यामुळे व्यापारीही त्यांच्या जाळ्यात सहज अडकत होते.
दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर रोजी इंदूर येथील एका व्यावसायिकाने या प्रकरणी तक्रार केली होती. मोठे व्यापारी असल्याचे भासवून काही लोकांनी फोन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला.
काही दिवस संपर्कात राहिल्यानंतर त्याला बरोशा येथे नेले आणि नंतर अंगडियाकडून व्यवसायाच्या नावाखाली 20 लाख रुपये घेऊन पोबारा केला. या टोळीने आपला मोबाइल बंद केल्याने त्यांना ट्रेस करता येत नसल्याचं या व्यापाऱ्याने तक्रारीत नमूद केल्याचं दिंडोशी पोलिसांनी सांगितलं.
या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांद्वारे कुमावत टोळीतील पाच आरोपींना अटक केली. या टोळीने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू केला आहे.
विक्रम अचलराम कुमावत वय 23 वर्षे, मुकेश तगाराम कुमावत वय 28 वर्षे, हसमुख पुखराज सुराणा वय 52 वर्षे, मोहनलाल कुमावत वय 32 वर्षे आणि विक्रम लालचंद सुराणा वय 47 वर्षे अशी या पाचही आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी राजस्थानी असून त्यांना मुंबई आणि विरार परिसरातून अटक करण्यात आली आहे.