मुंबई : मुंबईत गुन्हेगारी फोफावली आहे. मुंबईत सातत्याने चोरीच्या घटना समोर येत असतात. पण चोरटे काय चोरतील याचा अंदाज नाही. काही चोरटे घरफोड्या करतात, काही चोरटे लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेऊन सर्वसामान्यांचे खिसे कापतात. काही चोरटे मोबाईल चोरी करतात. या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यशही येतं. पण चोरटे त्यांची विकृती काही सोडताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे मुंबईत एक अतिशय विचित्र प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी चक्क 90 फूट लांबीचा लोखंडी पूलच चोरुन नेला. या पुलाचं वजन तब्बल 6 हजार किलो इतकं आहे. पण चोरट्यांनी हा पूलही स्वत:च्या घशात घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची ही चोरी मुंबई पोलिसांकडून पकडण्यात आली आहे.
मुंबईत मालाड परिसरात हा पूल होता. खरंतर हा पूल अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचा आहे. मुंबईतील मालाड भागात मागच्या रस्त्यावर एका नाल्याच्या वर तो ठेवण्यात आला होता. मोठ्या वीज तारा वाहून नेण्यासाठी त्याचा वापर केला जात होताय नंतर नाल्यावर कायमस्वरूपी पूल बांधल्यावर लोखंडी पूल अन्य ठिकाणी हलवण्यात आला. पण हा पूलच चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाचे वजन 6 हजार किलो होते. चोरट्यांनी आधी हा पूल गॅस कटरने कापला आणि नंतर तो ट्रकमध्ये नेला. बांगूर नगर पोलिसांनी ट्रकच्या नोंदणी क्रमांकावरून 4 जणांना अटक केली आहे.
पोलिसांना तपासादरम्यान कळले की, ब्रिजला 6 जूनला शेवटचे पाहिले होते. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या मदतीने आरोपींना पकडले. पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये 11 जूनला एक मोठा ट्रक पुलाकडे जाताना दिसला. पोलिसांनी ट्रकच्या नंबरप्लेटवरुन चोरांना शोधून काढलं.
पोलिसांना तपासात महत्त्वाची माहिती मिळाली. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच चोरीची घटना घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सध्या आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. तसेच पुलाचा मालही जप्त करण्यात आला आहे.