चांगला फायदा मिळवून देणार, गुंतवणुकीतून चांगले व्याजदर मिळणार, या पद्धतीने फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहे. ठाण्यात 21 कोटी रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिघांनी मिळून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 25 कोटी रुपये घेतले. ही रक्कम दिल्यानंतर पैसे मिळत नव्हते. त्यानंतर खूप मागे लागल्यावर चार कोटी रुपये परत केले. मात्र, 21 कोटी रुपये न दिल्यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 43 वर्षीय प्रिंटिंग आणि पॅकेजिंग व्यावसायिकाला तीन लोकांनी त्यांच्या उपक्रमात गुंतवणूक करण्यास सांगितले. प्रवीण कुमार अग्रवाल, सोनल प्रवीण कुमार अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार चंद्रा यांनी गुंतवणुकीतून चांगल्या नफ्याचे आश्वासन दिले होते. या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून दिला. आरोपींच्या प्रभावाखाली पीडितेने त्यांच्या कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. एकूण 25 कोटी रुपये गुंतवले. मार्च 2016 पासून त्यांच्या ‘आरजे ॲडव्हेंचर्स अँड रिॲलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ मध्ये ही गुंतवणूक केली. एवढी मोठी रक्कम गुंतवणूक करुनही परतावा न मिळाला नाही. हा प्रकार ऐकल्यावर पोलीस अचंबित झाले.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी तक्रारदाराला सुमारे 4 कोटी रुपये परत केले, परंतु उर्वरित 21 कोटी रुपये आणि त्याच्या गुंतवणुकीवरील नफ्याबद्दल टाळाटाळ केली. वारंवार विनंती करूनही पैसे परत न झाल्याने पीडितेने चितळसर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.