मुंबई : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील अंधेरी साकीनाका परिसरात घडली. याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात भादवि कलम 452, 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या पाच तासात गुन्ह्याचा उलगडा करीत आरोपीला अटक (Arrest) केली आहे. रिमा यादव (22) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे तर मनोज प्रजापती (22) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये वैवाहिक वाद (Dispute) होते. यामुळे दोघे पती पत्नी विभक्त राहत होते. याप्रकरणी साकीनाका पोलिस पुढील तपास करीत आहेत.
रिमा यादव आणि मनोज प्रजापती यांच्यात वैवाहिक वाद होते. यामुळे ते दोघे गेल्या 10 दिवसापासून वेगळे राहत होते. पतीपासून वेगळी राहत असल्यापासून रिमाकडे कामधंदाही नव्हता. त्यामुळे रिमा आधी काम करत असलेल्या कंपनीतील तिचा मित्र रोहित लालमण रविदास (18) हा तिला मदत करत होता. रोहित हा घाटकोपर येथील रहिवासी असून रिमाला दहा दिवसापासून नाश्ता आणि जेवण आणून द्यायचा. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 7.30 वाजता रोहित रिमासाठी नाश्ता घेऊन आला. मात्र रिमाच्या घरी आल्यानंतर समोरील दृश्य पाहून रोहितच्या पायाखालची जमिनच सरकली. घरात रिमा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. रोहितने तात्काळ साकीनाका पोलिसांना घटनेची माहिती दिली. साकीनाका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी रिमाला राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळावरुन मयत महिलेचा मोबाईल ताब्यात घेतला. तसेच घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही प्राप्त केले. तपासादरम्यान रिमाचा पती मनोजलाही ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला आरोपीने पत्नीच्या मित्रावर संशय व्यक्त केला होता. मात्र त्याच्या नखांमध्ये रक्ताच्या छटा आढळून आल्याने त्याचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून हत्येत वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.