मुंबई : इनकम टॅक्सने (Income Tax Raid) मोठी कारवाई करत देशातील वेगवेगळ्या राज्यात तब्बल 53 ठिकाणी छापेमारी केली आहे. 100 वाहनं, 300 पेक्षा जास्त पोलीस (Police News) यांच्यासह सीआरपीएफ जवान या छापेमारीदरम्यान तपास करत असल्याची माहिती मिळतेय. इनकम टॅक्सने महाराष्ट्रातील मुंबईसह (Mumbai Crime News) राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, बंगळुरु या ठिकाणीही छापेमारी केली आहे. राजस्थानातील मिड मे मिल बनवणाऱ्यांना छापेमारी दरम्यान टार्गेट करण्यात आलं आहे. यात राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्या मालमत्तांवरही इनकम टॅक्सने छापेमारी केल्याची माहिती मिळतेय. कोट पुतलीमधील राजेंद्र यादव यांच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे.
टॅक्स चोरी, राजकीय फंडिंग या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळतेय. देशातील वेगवेगळ्या भागात एकाच वेळी छापेमारी करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. सध्या एकूण 53 ठिकाणी शोध मोहीम आयकर विभागाच्या पथकाकडून राबवली जातेय.
राजस्थानातील मिड-डे मिल घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी करण्यात आली आहे. शिवाय बंगळुरुतील मनिपाल ग्रूपवही छापा टाकण्यात आला आहे. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये मिड डे मीलशी संबंधित असणाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापा टाकण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी कसून तपास केला जातोय.
राजस्थानातील राज्यमंत्री राजेंद्र यादव आणि मिड डे मिलशी संबंधित असणाऱ्यांवर आयकराने धाड टाकलीय. जिथे पोषण आहार बनवला जातो त्या राजेंद्र यादव यांच्या कोट पुतली मधली फॅक्टरीतही छापा टाकण्यात आला आहे. पोलीस, सीआरपीएफ जवान यांची मदत घेत छापेमारी करण्यात आलीय. सकाळसकाळची आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी करत तपास सुरु केलाय.
महत्त्वाचं म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि बंगळुरुतही छापा टाकण्यात आला. बंगळुरुच्या मनिपाल ग्रूपवर छापा टाकण्यात आला असून यात एकूण 20 ठिकाणी सध्या तपास केला जातोय. तब्बल 20 ठिकाणी एकाच वेळी बंगळुरूत छापेमारी करण्यात आली. यात सगळ्यांवर कर बुडवल्याचा आरोप करण्यात आलाय. मिड डे मिल घोटाळा प्रकरणी मुंबईतही चार ते पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
राजकीय पक्षांना मोठमोठ्या देणग्या देण्याच्या नावाखाली कर चुकवणाऱ्यांना दणका देण्यासाठी आयकर विभागाने ही छापेमारी केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. सध्या ही छापेमारी सुरु असून यात तपासातून नेमकं काय घबाड आढळून येतं, हे पाहणं महत्त्वाचंय. उत्तर प्रदेश ,दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगसह अनेक राज्यात सध्या इनकम टॅक्स विभाग कसून तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.