मुंबई : स्टार बॅक प्रजातीच्या कासवांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला मुंबईच्या MHB पोलिसांनी अटक केली. तसंच लाखो रुपये किंमतीचे कासवही पोलिसांनी आरोपीकडून जप्त केले आहेत. एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही लोक स्टारबॅक प्रजातीच्या कासवांची तस्करी करणार असल्याची गुप्त माहिती पोलिस उपनिरीक्षक डॉ.दीपक हिंदे यांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कासवांची तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कासवांची तस्करी होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक डॉ.दीपक हिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांना दिली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणपत पाटील नगर गल्ली क्रमांक ४ समोरील लिंक रोडवरून एका ३३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. या आरोपीकडून 20 कासवं जप्त करण्यात आली आहेत.
स्टार बॅक नावाची दुर्मिळ कासवे जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत एक लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. स्टार बॅक प्रजातीची कासवे क्वचितच आढळतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला खूप मागणी असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
कासवांची तस्करी करणाऱ्या आरोपीचं नाव नदीम शुजाउद्दीन शेख असून तो मीरा रोडचा रहिवासी आहे. सध्या पोलिसांनी शेख याला अटक केली असून आरोपीने हे दुर्मिळ प्रजातीचे कासव कोठून आणले, त्याची तस्करी तो कोणाकडे करणार होता, याचा तपास सुरू आहे.
स्टार बॅक कासव घरात ठेवल्यानं पैसा वाढतात, असा समज लोकांमध्ये असल्यामुळे या कासवाची बाजारात भरपूर मागणी असल्याची माहिती आरोपी शेख यांनी पोलिासांच्या चौकशीत दिली आहे. या कासवांची तस्करी करणारं रॅकेटही सक्रिय असण्याची शंका उपस्थित केला जाते आहे. त्या अनुषंगानेही पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी केली जाते आहे.
स्टार बॅक कासव इंडियन टॉरटॉईज या नावानंही ओळखलं जातं. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत कासवाची ही प्रजाती प्रामुख्यानं आढळून येते. गेल्या काही वर्षात इंडियन टॉरटॉईजच्या संख्येत कमालीची घट झाली असल्याच्याही नोंदी समोर आल्या आहेत. त्यामुळे कासवांच्या या प्रजातीचं संवर्धन करण्याची गरजही प्राणीप्रेमींकडून व्यक्त केली जाते.