हिरा ढाकणे, टीव्ही9 मराठी, मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (Narcotics Control Bureau) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या आधीच समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईतील वाशी येथून गुन्हा वर्ग केल्यानंतर कोपरी पोलिस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने समीर वानखडे यांच्या वाशी येथील सतगुरु बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे.
“समीर वानखेडे यांचे पिता ज्ञानदेव वानखेडे हे 1997 मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढलं होतं. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावानं हे परमीट घेण्यात आलं. त्यावेळी समीर यांचं वय होतं 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस. वडील उत्पादन शुल्क विभागात काम करत होते. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे” असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.
समीर वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे सतगुरु बार आहे. या बारचं परमीट नूतनीकरणही करण्यात आलं आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या बारचं परमीट नूतनीकरण करण्यात आलं आहे. हा बार आणि रेस्टॉरंट आहे, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या :
संजय राऊतांच्या व्याह्यांचा वानखेडेंना झटका, नवी मुंबईतील हॉटेलचा बार परवाना कायमचा रद्द
समीर वानखेडेंची बदली, NCB च्या विभागीय संचालकपदी कोणाची वर्णी?
अल्पवयीन असतानाच समीर वानखेडेंना बारचं परमीट मिळालं; मलिकांकडून वानखेडे कुटुंबाचा आणखी फर्जीवाडा उघड