मुंबई : मुंबई पोलिसांनी एका अनोख्या चोरट्याला जेरबंद केलं आहे. सकाळी सकाळी टॉयलेटला (Toilet) जाणाऱ्या चालकांची रिक्षा घेऊन पसारा होणारा चोरटा (Auto rickshaw thief ) सापडला आहे. मालाड पोलिसांनी (Malad Police) त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला रिक्षा लावून शौचास जाणाऱ्या चालकांच्या रिक्षा घेऊन हा चोरटा पसार व्हायचा. जसवंत राय असं आरोपीचं नाव असून तो 36 वर्षांचा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सार्वजनिक शौचालयाजवळच्या रिक्षांची चोरी होण्याचे प्रकार वाढले होते. जुलै 2019 पासून जून 2021 पर्यंत पाच घटना घडल्या.
ऑटोरिक्षा चोरी झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर मलाड पोलिसांनी या चोरांसाठी शोधमोहीम सुरू केली. त्यानुसार पोलिसांनी एका चोरट्याचा शोध घेतला. हा आरोपी मालाड पश्चिम येथील लिबर्टी गार्डनच्या बाजूला एका रिक्षातच राहतो. तो दररोज दारुच्या नशेत असतो. पोलिसांनी त्याला 26 जुलैला बेड्या ठोकल्या.
या आरोपीने आतापर्यंत 6 रिक्षांची चोरी केली. मालाडमधून चार आणि सांताक्रुझमधून दोन रिक्षा या भामट्याने लांबवल्या. पोलिसांनी आरोपीकडून 6 रिक्षा हस्तगत केल्या आहेत.
जसवंत राय हा पूर्वी स्वत: रिक्षा चालवत होता. त्याची स्वत:ची रिक्षा नव्हती, तो भाड्याने घेऊन रिक्षा चालवत होता. आपली स्वत:ची रिक्षा असावी अशी त्याची इच्छा होती. पण दारुच्या व्यसनाने त्याची ही इच्छा पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्याने रिक्षा चोरीला सुरुवात केली.
महत्त्वाचं म्हणजे जसवंत हा चोरी केलेली रिक्षा विकत नव्हता. तो ती रिक्षा चालवून पैसे मिळवायचा. त्यानंतर जिकडे रिक्षातील गॅस संपेल तिकडे ती रिक्षा उभी करून जायचा.