मुंबई : अंनिसच्या विरोधाला न जुमानता बागेश्वर बाबा काल मुंबईत आले. मुंबईतील मीरा रोड येथे त्यांनी प्रवचनही दिले. त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मीरा रोडमध्ये लोटले होते. त्यामुळे बाबांच्या दरबारात प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी एवढी होती की बसायलाही जागा नव्हती. गर्दीमुळे या भागात काही प्रमाणात रेटारेटीही झाली. गर्दीला आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हा बंदोबस्तही तोकडा पडला. गर्दीला आवरता आवरता पोलिसांनाही नाकीनऊ आले. एकीकडे या गर्दीला आवरण्याच्या कामात पोलीस मग्न झालेले असतानाच दुसरीकडे चोरांनी या गर्दीचा फायदा घेत हाथ की सफाई केली. चोरट्यांनी दरबारात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी लंपास केल्या. त्यामुळे दरबार संपल्यानंतर महिलांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी केली होती. या महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या होत्या.
काल संध्यकाळी 5.30 वाजता बागेश्वर बाबांचा दरबार सुरू झाला. रात्री 9 वाजता त्यांचा दरबार बंद झाला. दरबार संपल्यानंतर लोक घराकडे निघाले. पण जवळपास 50 ते 60 महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आल्याने पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. मात्र, त्यानंतर महिलांनी जे सांगितलं त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले. कार्यक्रमाच्यावेळी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चेन चोरांनी लंपास केल्याची तक्रार या महिलांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 36 महिलांनी त्यांचे दागिने लंपास झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलीस ठाण्यात आलेल्या महिला वैतागलेल्या आणि संतापलेल्या होत्या.
या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 4 लाख 87 हजार रुपये किमतीचे त्यांचे दागिने चोरीला गेले आहेत. या महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मीरा रोड येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दोन दिवस प्रवचनाचा कार्यक्रम आहे. काल हा कार्यक्रम पार पडला. आज प्रवचनाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे या दिव्य दरबाराला आजही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
यावेळी बागेश्वर बाबा यांनी भारत हिंदू राष्ट्र होणार असल्याचं सांगितलं. भारत तेव्हाच हिंदू राष्ट्र होईल तेव्हा हिंदूंमध्ये एकता येईल. इतर धर्माचे लोकही या हिंदू राष्ट्रात राहतील. आपला धर्म जोडायला शिकवतो. सनातन धर्माला कमीपणा येईल असं कोणतंही कृत्य आम्ही करणार नाही. आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरातील एक मुलगा रामासाठी द्या. ज्यांना बागेश्वर धाममध्ये भोंदूगिरी दिसते, अंधश्रद्धा दिसते अशा मूर्ख लोकांनी आमच्यासमोर आलं पाहिजे, असं बागेश्वर बाबा म्हणाले.
आमच्यासाठी नाही तर सनातन धर्मासाठी मुंबईकरांनो तुम्हाला उठावं लागणार आहे. येणाऱ्या पिढीसाठी तुम्हाला उठावं लागणार आहे. कारण भविष्यात रामाच्या मंदिरावर कोणी दगड मारू नये आणि रामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नही विचारू नये. पालघरमध्ये संतांबाबत जे झालं, ते पुन्हा होऊ नये. तांत्रिकांच्या नादी लागून कुणाच्याही घराची वाताहत होऊ नये. त्यासाठीच बागेश्वर धाम दरबार सुरू राहील, असंही ते म्हणाले.