मुंबई / 24 जुलै 2023 : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या नजरेतून सुटत नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा कांदिवलीत आला आहे. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशातून मुंबईला आलेल्या चोरट्याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून बंदूक, कार, जिवंत काडतूस आणि अॅक्टिव्हा ताब्यात घेतली आहे. फरान हनीफ कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुरेशी हा उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवासी आहे. आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. याआधी कांदिवलीत समता नगर परिसरात गोळीबार करत आरोपीने चोरी केली होती. या गुन्ह्यातून तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आरोपी मूळ गावी यूपीतील मेरठला गेला. तेथे त्याने देशी कट्टा खरेदी केला. मग तेथून तो दिल्लीला गेला. दिल्लीत त्याने दोन कार चोरल्या. त्यानंतर दरोडा टाकण्याची तयारी करुन मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर तो दररोज दोन्ही गाड्यांवर मुंबईतील दुसऱ्या वाहनाची डुप्लिकेट नंबर प्लेट लावून तो दरोड्यासाठी रेकी करत असे.
या दरम्यान पोलिसांना आरोपीच्या या कटाचा सुगावा लागला. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. आरोपीने देशी कट्टा, जिवंत काडतूस, दोन कार आणि एक अॅक्टिव्हासह अटक केली. आरोपीने 2020 मध्ये समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून आरोपीने दागिन्यांचे दुकान लुटले होते. या गुन्ह्यात दीड वर्ष मुंबईच्या तुरुंगात राहिल्यानंतर आरोपी प्रथम मेरठला गेला आणि पुन्हा दरोडा टाकण्याची तयारी करुन मुंबई आला.