सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 22 सप्टेंबर 2023 : कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय विनोद कुमार मीना नावाच्या लोको पायलटचा राहत्या घरी संशयितरित्या मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्याच्या घरातले सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं. त्याचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळला. त्याचा मृत्यू नेमका कशामुले झाला, हे जाणण्यासाठी त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून विविध दृष्टिकोनातून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, डिझेल लोको शेडमध्ये टेक्निशियन पदावर काम करणारा 32 वर्षीय विनोद कुमार मीना हा कल्याण पूर्व शहर हाद्दीत कोळशेवाडी रेल्वे कॉलनी बिल्डिंगनंबर 978 रूम नंबर 14 मध्ये राहत होता. त्याचे कुटुंब राजस्थानला वास्तव्यास आहे. विनोदचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून त्याच्याबरोबर बोलण्यासाठी फोन करत होते. मात्र तो फोन उचलत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या संपर्कात असलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याशी संपर्क साधला.
विनोदच्या नातेवाईकांनी त्याच्या ओळखीच्या रेल्वे कर्मचाऱ्याला विनोदच्या घरी जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर तो रेल्वे कर्मचारी विनोदला पाण्यासाठी त्याच्या घरी आला. मात्र घराची आतून कडी लावलेली होती. संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याने वारंवार बेल वाजूनही घर कोणी उघडत नव्हतं. त्यामुळे या रेल्वे कर्मचाऱ्याने विनोदचे नातेवाईक आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली.
यानंतर कल्याण कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घरात शिरून पाहिले असता विनोदच्या घरातल्या वस्तू अस्त्वस्त अवस्थेत आढळून आल्या. विनोद आपल्या बेडच्या खाली मृत अवस्थेत पडलेला दिसून आला. यानंतर कल्याण कोळसाडी पोलिसांनी त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले. त्याचा रिपोर्ट नंतर विनोदचा मृत्यू कशाने झाला? हे स्पष्ट होणार आहे.
मात्र विनोदाचा मृत्यू दोन दिवसापूर्वीच झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर विविध दृष्टिकोनाने संशय घेत सध्या कोळशेवाडी पोलीसांनी नेमका प्रकार काय आहे? नेमकं काय घडलंय? याचा शोध सुरू केला आहे.