मुंबई : सात वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईतील वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणाचा आरोपी तिचा नातूच निघाला. दुसऱ्या प्रेम विवाहाला विरोध केल्याने नातवानेच आजीचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मुंबईतील पवई भागात राहणाऱ्या 75 वर्षीय वृद्ध महिलेची जून 2014 मध्ये हत्या करण्यात आली होती.
वृद्धेच्या हत्या प्रकरणाचा अथक प्रयत्न करुनही पोलिसांना आरोपी सापडत नव्हता. गुन्हे शाखा युनिट-10 च्या पथकाने तपास करत इतक्या वर्षांनंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आणि नातवाला जेरबंद केलं. यावेळी तो तिसऱ्या बायकोसोबत राहत होता.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील के.बी. एम. कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या 75 वर्षीय शशिकला वाघमारे यांचा मृतदेह जून 2014 मध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. हत्या केल्यानंतर शशिकला वाघमारेंचे दागिनेही चोरण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करुनही आरोपीचा शोध लागला नव्हता. त्यामुळे गुन्ह्याचा तपास काही काळाने मंदावला होता.
दरम्यान, युनिट -10 चे प्रभारी निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धनराज चौधरी, गणेश तोडकर तसेच धारगळकर, शेटये, धलावडे या पथकाने गुन्ह्याचा पुन्हा नव्याने तपास सुरु केला. नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केली, पण काहीच निष्पन्न झाले नाही.
नातू कुटुंबीयांच्या संपर्काबाहेर
शशिकला वाघमारेंचा नातू प्रदीप सोनावणे (वय 38 वर्ष) हा नातेवाईक किंवा मित्र मंडळीच्या संपर्कात नसल्याचं समोर आलं. तसेच आजीची हत्या झाल्यापासून तो बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी प्रदीपवर लक्ष केंद्रित केले, परंतु त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता.
अखेर सोशल मीडियावर फोटो सापडला
प्रदीप सोशल मीडिया वापरत नव्हता. कुटुंबियांच्या संपर्काबाहेर होता. त्यामुळे त्याचा शोध घेणं हो पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत होतं. शोध सुरु असतानाच प्रदीपने एका नातेवाईकाला फेसबुक मेसेंजरवरुन संपर्क साधला त्यानंतर आपले खाते डिलीट केल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन पोलिसांनी त्याचा फोटो मिळवला.
कल्याणमध्ये तिसऱ्या बायकोसोबत वास्तव्य
प्रदीप सोनावणे कल्याणमध्ये राहत असून रंगारी म्हणून काम करत असल्याचे तपासात समोर आले. त्याआधारे पोलिसांनी कल्याणमधील नांदिवली गाव गाठले. तिथे तिसऱ्या बायकोसोबत राहणाऱ्या प्रदीपला पोलिसांनी पकडले. दुसऱ्या लव्ह मॅरेजला आजीचा विरोध होता. तसेच ती आपल्या पत्नीला भडकवायची, या रागातून आजीचा गळा दाबून हत्या केली होती, अशी कबुली आरोपी प्रदीप सोनावणे याने पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिली.
संबंधित बातम्या :
प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा
पत्नीच्या हत्या प्रकरणातून जिने जामिनावर सोडवलं, त्याच बहिणीचा भांडणानंतर खून
वडिलांपाठोपाठ लेकही गेला, कृषी पंपाचे कनेक्शन जोडताना खांबावरच शॉक, 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू