मुंबई : मुंबईत सोनसाखळी चोराला अटक करण्यात आली आहे. आरोपी व्यवसायाने जिम ट्रेनर आहे, मात्र पैसे नसल्यामुळे त्याने चेन स्नॅचिंगला सुरुवात केली. दहिसर भागातील महिलेची सोन्याची चेन आणि मंगळसूत्र खेचून पसार झाल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील बोरीवली पश्चिम भागातील एमएचबी पोलिसांनी एका आरोपीला चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. 32 वर्षीय आरोपी समीर शिवाजी शेलार हा व्यवसायाने जिम ट्रेनर आहे. पैशांची चणचण असल्यामुळे त्याने सोनसाखळी चोरीचा मार्ग अवलंबल्याची माहिती आहे.
दहिसरमध्ये चेन स्नॅचिंग
दहिसर पश्चिम मच्छी मार्केट जवळून एका महिलेची चेन आणि मंगळसूत्र खेचून आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी वसई रोड रेल्वे पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोक्यावर कर्जाचा डोंगर
समीर शेलार हा पूर्वी मालाड येथे राहत होता. जिथे त्याने जिम ट्रेनर म्हणून काम केले. मात्र पैशांअभावी तो पत्नीसोबत विरार येथे राहायला गेला. तिथे त्याच्याकडे काम नव्हते आणि डोकावर कर्ज आले. मात्र सहज पैसे मिळवण्याच्या हेतूने त्याने चेन स्नॅचिंग सुरु केले.
काय होती मोडस ऑपरेंडी?
आरोपी कोणत्याही परिसरात पायी जात असे आणि एकट्या चालणाऱ्या महिला पाहून आधी तिचा पाठलाग करत असे. नंतर तिचे मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने हिसकावून रस्त्यावरुन पळ काढत असे. चोरीचे सोने विकणाऱ्या सूरज यादव नावाच्या आरोपीलाही पोलिसांनी शेलारसोबत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन चेन आणि दोन मंगळसूत्र जप्त केली आहेत. ज्याची किंमत सुमारे 1 लाख 25 हजार रुपये आहे.
संबंधित बातम्या :
Video| भिवंडीत घराच्या समोर पार्क केलेली रिक्षा चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगरात जेष्ठ नागरिकांना साडेपाच कोटींचा गंडा, जास्त परताव्याचं आमिष देत केली फसवणूक