मुंबई : मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना बेड्या ठोकल्या आहे. तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी सुजाता पाटील यांनी केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
40 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने सापळा रचून एसीपी सुजाता पाटील यांना कार्यालयात अटक केली. मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सुजाता पाटील कार्यरत आहेत. पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
कोण आहेत सुजाता पाटील?
मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त
याआधी हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षकपदाचीही जबाबदारी
हिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र
आत्महत्या किंवा राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत
सुजाता पाटील याआधीही चर्चेत
बदली करताना माझा विचारच करण्यात आला नाही, त्यातच मी कर्जबाजारी झाले असून माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्या करणे किंवा राजीनामा देणे, हेच पर्याय असल्याचे पत्र हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षकपदी असताना सुजाता पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.
काय होते सुजाता पाटील यांचे बहुचर्चित पत्र?
मी सांगली पोलिस कोठडीमध्ये मृत अनिकेत कोथळे यांची तीन वर्षांची मुलगी दत्तक घेतली असून मला तीन मुलं आहेत माझी मुलगी सतरा वर्षांची आहे. माझी मुले मुंबईत शिक्षण घेत असून त्यांना रस्त्यावर मुंबई सोडून मी 16 तास प्रवास करुन हिंगोलीमध्ये नोकरी करत आहे. माझ्या नंतर बदली झालेले अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर न होता त्यांच्या सोयीनुसार बदल्या दोन -तीन महिन्यांमध्ये परत मुंबईमध्ये करण्यात आल्या, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
मी माझ्या कुटुंबाचा मुंबईमधील खर्च व माझा हिंगोली येथील वाढीव खर्च यामुळे कर्जबाजारी झालेली आहे. माझे कुटुंब पूर्णतहः उद्ध्वस्त झालेले असून मी प्रचंड तणावाखाली नोकरी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. जर माझी बदली मुंबईत होत नसेल तर माझी बदली गडचिरोली नक्षल विभागात करण्यात यावी. जेणेकरून कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्यास शहिदांना मिळणारे फायदे माझ्या कुटुंबियांना मिळतील आणि त्यांचे पुनर्वसन होण्यास मदत मिळेल असेही त्यांनी त्या पत्रात नमूद केले होते.
संबंधित बातम्याः
आयपीएल बुकीची ‘माया’ पडली महागात; 3 लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला नाशिकमध्ये बेड्या
निवृत्त सहकाऱ्याकडे लाचेची मागणी, नाशकात महिला-पुरुष लिपीक जोडगोळी रंगेहाथ जाळ्यात
नाशिक शिक्षणाधिकारी लाच प्रकरण, वैशाली झनकर यांचा जामीन अर्ज फेटाळला, आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी