मुंबई : पतीला जीवे ठार मारण्यासाठी महिलेने प्रियकराला सुपारी (Boyfriend) दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबईत विवाहितेसह तिच्या बॉयफ्रेण्डला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात (Attack) महिलेचा पतीचा गंभीर जखमी झाला आहे. मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ (Andheri Mumbai) जुनी पोलीस वसाहत परिसरात कोर्ट गल्लीजवळ 38 वर्षीय विरेन दिनेश शहा यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर हल्लेखोर स्कूटरवरुन अंधेरी कोर्टाच्या दिशेने भरधाव वेगाने पळून गेले होते. मात्र अंधेरी पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणात विरेन दिनेश शहा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करत घटनास्थळवरील संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधून काढले. या गुन्ह्यात आरोपींनी कोणतेही धागेदोरे मागे सोडले नव्हते. त्यामुळे घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे यातील संशयितांचा मागोवा काढण्यात आला. तसेच जखमी विरेन आणि त्यांच्या पत्नीच्या वापरत्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन त्याआधारे तपास करण्यात आला.
सखोल चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे यातील गुन्हेगार हे गुजरात मधील सुरत येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सुरत शहरात जाऊन सापळा रचत नाडीयाड वेस्ट पोलीस ठाण्याच्या मदतीने अभिषेक जीवनकुमार बारोट (वय 26 वर्षे) या संशयितला ताब्यात घेण्यात आले.
अभिषेक जीवनकुमार बारोट याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्या साथीदाराचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार फरार आरोपी विपुल प्रविणभाई पटेल (वय 35 वर्ष) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.
अटकेतील आरोपी विपुल प्रविणभाई पटेल याचे फिर्यादीच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. यातूनच आरोपी विपुल पटेल आणि जीनल शाह यांनी विरेन शाह याच्या हत्येचा कट रचल्याचे सकृत दर्शनी तपासात निष्पन्न झाले. म्हणून जखमी विरेनची पत्नी जीनल विरेन शाह हिला देखील अटक करण्यात आलेली आहे.
आरोपीना अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिव्हा स्कूटर, गुन्हा करताना वापरलेले कपडे आणि हत्यार जप्त करण्यात आलेले आहे.
संबंधित बातम्या :
मायलेकाने बापाला संपवलं, मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, बँक अधिकाऱ्याच्या हत्येने मुंबईत खळबळ
पतीची हत्या करुन मृतदेह शेतात जाळला, हिंगोलीत पत्नीसह दोन मुलं जेरबंद