मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पलांडे यांना ईडीने दुपारी ताब्यात घेतलं आहे. संजीव पालांडे यांची सध्या चौकशी सुरु आहे. त्यानंतर ईडीने देशमुख यांच्या आणखी एका जवळच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ईडीने देशमुख यांचे खासगी पीए कुंदन शिंदे यांना ताब्यात घेतलं आहे. ईडी त्यांची देखील कसून चौकशी करणार आहे. याशिवाय ईडीची कारवाई अद्यापही सुरुच आहे. विशेष म्हणजे सकाळी साडेसात वाजेपासून ईडीचं धाडसत्र सुरु आहे. याशिवाय ईडीने सकाळपासून अनेकांचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये काही बार मालकांचा देखील समावेश आहे. या बार मालकांनी देशमुखांना काही महिने चार कोटी रुपये हप्ता दिल्याचं कबूल केलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh PA Kundan Shinde and PS Sanjiv Palande are in ED custody).
ईडी अधिकारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सीआरपीएफ जवानांच्या एका पथकासह अनिल देशमुख यांच्या मुंबईतील खासगी निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीत पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत जवळपास 10 सीआरपीएफ जवान होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत फॉरेन्सिक टीमही होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दोन गाड्या सुखदा इमारतीच्या परिसरात आल्या. यापैकी पुढच्या गाडीत स्वत: अनिल देशमुख होते. ईडी अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांचे आणि निकटवर्तीयांचे मोबाईल आणि डिजीटल डेटा ताब्यात घेतला. त्यानंतर फॉरेन्सिक टीम दुपारी अडीच्या सुमारास सुखदा इमारतीतून बाहेर पडताना दिसली (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh PA Kundan Shinde and PS Sanjiv Palande are in ED custody).
ईडीचे दोन पथक आज सकाळी 8 वाजता अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या सिव्हिल लाईन भागातील ‘श्रद्धा’ या निवासस्थानी पोहचले. यावेळी अनिल देशमुख हे घरी नव्हते. ते मुंबईतील त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी होते. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य आणि काही कर्मचारी घरात होते. या सर्वांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली. या कारवाईत ईडी अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रांची तपासणी केली. तसेच काही कागदपत्रे जप्त केली. महत्वाचे म्हणजे यावेळी केंद्रीय राखीव दलाचे साधारणतः 20 सशस्त्र जवानांनी देशमुख यांच्या घराला वेढा घातला होता. सोबतच शहर पोलीस दलातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. सुरुवातीला शहर पोलिसांना या छाप्याची माहिती नव्हती. अत्यंत गोपनीय पद्धतीनं हा छापा टाकण्यात आला.
नागपुरात ईडीची छापेमारी सुरु असताना ईडीच्या दुसऱ्या पथकांनी अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घरी देखील छापे टाकले. देशमुख सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. ईडीने देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर छापा टाकला. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगल्याचा ताबा सोडलेला नाही. विशेष म्हणजे हा बंगला वर्षा बंगल्याच्या अगदी बाजूलाच आहे. या बंगल्यात ईडीचे अधिकारी पोहोचले. तसेच सीआरपीएफ जवानांची एक टीमसुद्धा या ठिकाणी पोहोचली.
एकीकडे ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सकाळपासून छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याचं कळंतय.
दरम्यान, सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.
संबंधित व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
अनिल देशमुखांना धक्क्यावर धक्के, ईडीचे सकाळपासून तब्बल पाच ठिकाणी छापे