साकीनाका बलात्कार प्रकरणी गृह विभागाची महत्त्वाची बैठक, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा? दिलीप वळसे पाटील म्हणतात…

| Updated on: Sep 13, 2021 | 9:39 PM

साकीनाका परिसरातील बलात्काराच्या घटनेने मुंबईसह महाराष्ट्र हादरला आहे. या बलात्काराच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? या विषयावर चर्चा करण्यासठी गृह विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

साकीनाका बलात्कार प्रकरणी गृह विभागाची महत्त्वाची बैठक, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा? दिलीप वळसे पाटील म्हणतात...
दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
Follow us on

मुंबई : साकीनाका परिसरातील बलात्काराच्या घटनेने मुंबईसह महाराष्ट्र हादरला आहे. या बलात्काराच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? या विषयावर चर्चा करण्यासठी गृह विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर वळसे पाटील यांनी बैठकीत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली.

दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले?

“गेल्या काही दिवसात महिलांच्या संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांवर ठोस पावलं उचलण्यासाठी आज गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पुढच्या काळात अशा घटना घडू नये म्हणून काय उपाययोजना, जनजागृती करता येईल, घटना घडलीच तर ताबडतोब उपाय करणे, कारवाई करणे, पेट्रोलिंग करणे जेणेकरुन अशा घटना घडणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याबाबतची चर्चा झाली”, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायद्याचा विधेयक मांडू’

“शक्ती कायदा बाबत जे विधेयक मांडले ते जॉईंट सिलेक्ट समितीकडे गेले आहे. त्या कमिटीमध्ये चर्चा सुरु आहे. ती पूर्ण झाल्यावर येत्या नागपूर आधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येईल, तो कायदा तिथे मंजूर करुन अंमलबजावणी करण्यात येईल. पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना एकत्रित करुन तसा कार्यक्रम काही दिवसात सुरु करु”, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

‘पाच वर्षाच्या आढाव्यात गुन्ह्याचे प्रमाण सारखेच’

“गुन्हे घडताना दिसत आहेत, आज जे प्रेझेंटेशन समोर आले त्यात जास्त गुन्हे दोन्ही व्यक्ती एकमेकांना ओळखणाऱ्या होत्या, त्यांच्यात गुन्हे घडण्याचे प्रमाण जास्त आहे. पाच वर्षाच्या आढाव्यात गुन्ह्याचे प्रमाण सारखेच आहे”, असंदेखील ते म्हणाले.

‘पोलीस भरती लवकरच केली जाईल’

“बिल्डिंगच्या टेरेसवर एक घटना घडली. तिथे पोलीस पेट्रोलिंग शक्य नाही. पोलीस कमी आहेत हे मान्य आहे, ती भरती होईल आणि दिलासा मिळेल. तसेच होमगार्ड भरतीसाठी फंडची काही अडचण नाही. त्यांना माणसे पुरविण्यास सांगितले आहे”, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मुंबई पोलीस आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना जारी

दरम्यान, साकीनाका परिसरातील बलात्कारासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

1) साकीनाका येथील घटनेच्या वेळी पोलिसांच्या प्रतिसादाचे वेळ दहा मिनिटे होता. अशा घटनांमध्ये नियंत्रण कक्षाची भूमिका फार महत्त्वाची असते. महिला संदर्भात आलेल्या कॉलकडे दुर्लक्ष करु नये. त्याची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत कार्यवाही करावी.

2) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंधाराची ठिकाण, निर्जन आदी ठिकाण याचा पोलिसांनी आढावा घ्यावा. त्या ठिकाणी बीट मार्शल त्याचप्रमाणे पेट्रोलिंग मोबाईल यांची गस्त वाढवावी.

3) अंधाराच्या, निर्जन स्थळी लाईटची व्यवस्था करावी. त्यासाठी महानगरपालिका सोबत पत्रव्यवहार करावा. संबंधीत यंत्रणेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत पाठपुरावा करावा.

4) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंधाराची ठिकाण, निर्जन स्थळे या ठिकाणी क्यू आर कोड लावावा जेणेकरुन गस्तीवरील वहाने, गस्त करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा वावर होऊन अनुचित प्रकार टाळता येईल.

5) पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या ठिकाणी सार्वजनिक महिला शौचालय आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकांमार्फत पुरेशी लाईट दुरुस्त करुन घ्यावी तसेच त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक पाच यांची गस्त वाढवावी

6) रात्रीच्या गस्ती दरम्यान एखादा संशियत आढळल्यास पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी. आवश्यकता असल्यास कायदेशीर कारवाई करावी.

7) रात्रीच्या वेळी एखादी महिला एकटी आढळून आल्यास रात्रीची गस्त घालणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिची विचारपूस करुन त्यांना तात्काळ योग्य ती मदत द्यावी. खरंच गरज भासल्यास सदर महिला सुरक्षित दृष्टीने सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी.

8) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंमली पदार्थाची नशा करणारे, ड्रग्स जवळ बाळगणारे यांच्यावर कारवाई करावी.

9)पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावर बेवारसरित्या बराच काळापासून कमी असलेले टेम्पो टॅक्सी ट्रक आणि इतर गाड्या याची दखल घ्यावी त्या गाड्यांच्या मालकाचा शोध घेऊन ती वाहने त्यांना तेथून काढल्यास सांगावे ती वाणी तसेच बेवारस आढळल्यास ती ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी.

10) महिलांबाबत प्रामुख्याने 354, 363, 376, 509 आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातात. या कायद्या अंतर्गत अटक असलेल्या आरोपींची यादी तयार करण्यात यावी. या यादिस सेक्सयुअल ओफेडर लिस्ट म्हणून संबोधून या यादितील आरोपींवर योग्य ती कारवाई करावी.

11) ज्या पोलीस स्टेशन च्या हद्दीत मोठी रेल्वे स्टेशन आहेत, बाहेर गावच्या गाड्या येतात, त्या स्टेशनच्या बाहेर एक मोबाईल व्हॅन रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ठेवावी. बाहेर गावावरुन येणाऱ्या एकट्या महिलेस योग्य ती मदत करावी. त्या महिलेस तिच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करुन द्यावी. आणि त्या गाडीचा क्रमांक, ड्रायव्हरचा मोबाईल लिहून घ्यावा. त्यानंतर फोन करुन ती महिला व्यवस्थित पोहचली की नाही, याची चौकशी करावी.

12) रात्रीच्या वेळी गस्तीवरील अधिकाऱ्यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात भेट देऊन, तिथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दखल घ्यावी, असं आदेशात म्हटलं आहे.

हेही वाचा :

साकीनाका बलात्कार प्रकरणी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, 20 लाखाची मदत, वकील राजा ठाकरे यांची नेमणूक, मुंबई पोलीस आयुक्तांकडून 3 महत्त्वाच्या अपडेट