‘कारागृहातील आरोपी आमदाराच्या फार्म हाऊसवर जातो…’, गणपत गायकवाड यांच्यावर महेश गायकवाड यांचा आरोप

| Updated on: Jan 14, 2025 | 6:50 PM

Mumbai Crime News: आरोपी वैभव गायकवाड हा भाजपचा पदाधिकारी आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तो लोढा आणि दहा गाव परिसरात येऊन जातो याची माहिती पोलिसांना आहे. परंतु त्याला पोलीस अटक करीत नाही.

कारागृहातील आरोपी आमदाराच्या फार्म हाऊसवर जातो..., गणपत गायकवाड यांच्यावर महेश गायकवाड यांचा आरोप
गणपत गायकवाड महेश गायकवाड
Follow us on

उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड कारागृहात आहे. परंतु त्यांचा मुलगा वैभव गायकवाड याच्यासह त्याचे साथीदार कुणाल पाटील आणि नागेश बडेराव हे तिघे आरोपी फरार आहे. त्यामुळे महेश गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. गोळीबार प्रकरणातील आरोपी वैभव गायकवाड याला पकडून देणाऱ्या पोलिसांना २५ हजारांचे बक्षिस देण्याची घोषणा त्यांनी सांगितले. कारगृहातील आरोपी आमदाराच्या फार्म हाऊसवर जात असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे.

काय म्हणताय महेश गायकवाड?

पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे वैभव गायकवाड याला अद्याप अटक झालेली नाही. त्याला पकडून देणाऱ्या पोलिसांना 25 हजार रुपयांचे बक्षीस माझ्यातर्फे दिले जाईल. ही बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली जाईल, असे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

गेल्या वर्षी 2 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री पोलिस ठाण्यात जागेच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर आमदार गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. त्या प्रकरणास वर्षभर झाले तरी आरोपींना अटक झाली नाही. त्यामुळे महेश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत बक्षीस जाहीर केले आहे.

हे सुद्धा वाचा

…यामुळे त्याला अटक नाही

महेश गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी वैभव गायकवाड हा भाजपचा पदाधिकारी आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तो लोढा आणि दहा गाव परिसरात येऊन जातो याची माहिती पोलिसांना आहे. परंतु त्याला पोलीस अटक करीत नाही. भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे पोलीस या प्रकरणी दबावात काम करत आहे. हे सर्व प्रकरण घडूनही भाजपने वैभव गायकवाड याला पक्षाच्या पदावरुन दूर केलेले नाही. या प्रकरणी तीन आरोपींना जामीन मिळाला आहे.

आरोपी माजी आमदार मुंबईत फिरतात…

आरोपी माजी आमदार गायकवाड हे तळोजा जेलला असले तरी चेकअपच्या नावाखाली त्यांना जे. जे. रुग्णालयात आणले जाते. त्यानंतर तिथून ते मुंबई फिरतात. त्यानंतर ते पनवेल येथील एका आमदाराच्या फार्म हाऊसवर जाऊन पुढे तळोजा जेलला रवाना होतात, असा गौप्यस्फोट माजी नगरसेवक गायकवाड यांनी केला आहे. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी हा भाजपशी संबधित असल्याने त्याला पोलिस कोठडीत बिर्याणी खाऊ घातली असल्याचा आरोप माजी नगरसेवक गायकवाड यांनी केला आहे.