सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 4 डिसेंबर 2023 : कल्याण जवळच्या टिटवाळा शहरात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पतीने हत्या करून पत्नीचा मृतदेह ड्रममध्ये भरून जंगलात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच आरोपीने पत्नीच्या डोक्यात फावड्याचा दांडा टाकून, तिची गळा आवळून हत्या केली. अलीमुन अन्सारी (वय 35) असं मृत पत्नीचं नाव आहे. तर मैनोद्दीन अन्सारी असं आरोपी पतीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पती आपल्या पत्नीची इतक्या निर्घृणपणे हत्या करुच कसा शकतो? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. याप्रकरणी मृत महिलेचे वडील मोहमंद इंद्रीस सुबेदार खान यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
फिर्यादी मोहमंद इंद्रीस सुबेदार खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मैनोद्दीन अन्सारी याचं 2012 मध्ये अलीमुन अन्सारी यांच्याशी लग्न झालं होतं. दोघांना 11 वर्षांचा मुलगा देखील आहे. लग्नानंतर मैनोद्दीन आपल्या पत्नीसोबत चांगलं वागत होता. पण गेल्या तीन वर्षांपासून तो पत्नीला आपल्या माहेरच्यांकडून रिक्षा घेण्यासाठी 2 लाख रुपये आण, असा तगादा लावत होता. तो पैशांसाठी सातत्याने पत्नीला मारहाण करायचा. शेवटी अलीमुनच्या आई-वडिलांनी 80 हजार रुपये दिले. पण तरीही तो सातत्याने अलीमुनच्या मागे पैशांसाठी लागत होता. याबाबत अलीमुनच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सविस्तर सांगितलं आहे.
“एक महिन्यापूर्वी माझी पत्नी हकीमुन आणि मुलगा अहमद हे टिटवाळा येथे मुलीच्या घरी गेले होते. त्यांनी जावई मैनुद्दिन याला मुलीला त्रास देवू नका, असं समजावून सांगितलं होतं. माझी पत्नी हकीमुन हिने मुलगी अलीमुनला रविवारी संध्याकाळी 6 वाजता फोन करुन खुशाली विचारली. तेव्हा मुलगी अलीमुन हिने सांगीतलं की, तिला मैनुद्दिन याने माहेरहून रिक्षा घेण्यासाठी 2 लाख रुपये आण, नाहीतर तुला मारुन टाकेन, असा दम दिला. मी मुलीला समजावून सांगीतले तुला आजपर्यंत आम्ही 80 हजार रुपये दिलेले आहेत. आता आमच्याकडे पैसे नाहीत. तरीपण आम्ही थोडफार पैसे देतो, असे समजावून सांगितलं होतं”, असं मृतक महिलेच्या वडिलांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
दरम्यान, “मृतक महिलेची आई हकीमुन यांनी सोमवारी (4 डिसेंबर) मुलीला फोन केला. पण मुलीने फोन उचलला नाही. त्यामुळे हकीमुन यांनी दुपारी एक वाजता जावायाला फोन केला. यावेळी जावायाने धक्कादायक माहिती दिली. मी अलीमुन हिचा खून करून तिला जंगलात फेकून दिलंय. आता मी पोलीस ठाण्यात जातोय”, असं जावायाने हकीमुन यांना सांगितल्याची माहिती महिलेच्या वडिलांनी फिर्यादीत दिली आहे.
“आम्ही सदर घटना माझ्या नातेवाईकांना सांगून माझी पत्नी हकीमुन, मुलगा अहमद, माझा मोठा भाऊ मोहमंद हदीस खान आणि इतरांसह कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आलो, त्यावेळी पोलीसांकडून समजले की, पोलीस मैनुद्दीन याला घेवून नाळींबी गावाकडे घडलेल्या हकीगतीची खात्री करण्यासाठी गेले आहेत. आता मला पोलिसांकडून समजले की, नाळींबी गावाच्या शिवारात, नाळींबी ते अंबरनाथ दरम्यान जंगलातील रोडच्या कडेला काळ्या रंगाचे झाकण असलेल्या निळ्या रंगाचा ड्रममध्ये माझ्या मुलीचा मृतदेह सापडला आहे”, असं फिर्यादी वडिलाने सांगितलं आहे.