ठाणे : धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याच्या घटनांनंतर आता डोंबिवलीत रेल्वे ट्रॅकवर दगडं ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांच्या दरम्यान रुळावर गुरुवारी (26 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास दगडं ठेवल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळच हा प्रकार घडला. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय.
गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती व तांत्रिक तपास करत या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या साथीदाराचाही शोध सुरू आहे.
डोंबिवली जीआरपी पोलीस निरीक्षक मुकेश ढगे या प्रकरणावर बोलताना म्हणाले, “गुरुवारी (26 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्टेशन मास्तरांनी 48×70 या स्लोच्या डाऊन ट्रॅकवर दगडं ठेवलं असल्याची माहिती दिली. यानंतर आम्ही आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन मास्टर अशा सर्वांना घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ट्रॅकला खाली लहान मोठे दगडं असतात असे 15-20 दगडं ट्रॅकवर होते.”
” या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शुक्रवारी (27 ऑगस्ट) तपासात परिसरातील फुटेज काढल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेतलं. आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. इतर आरोपीही सापडल्यास त्यांच्यावरही पुढील कारवाई करण्यात येईल,” अशीही माहिती पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली.
Minor boys put stone on Dombivali Thakurli railway track police action