ठाणे : नवोदित अभिनेत्रीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कपडे फाटेस्तोर चोपलं आहे. या प्रकरणाचे व्हिडीओ देखील आता समोर आले आहेत. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्ह करत या प्रकरणाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सापळा रचत ठाण्याचा घोडबंदर रोडवरील फॉर्म हाऊसवर संबंधित निर्मात्यांना घेरलं. त्यानंतर त्यांना चांगलाच चोप देत तरुणीची सुटका केली.
“मनसेचे उपाध्यक्ष पदमनाथ राणे यांना आज एक मुलीचा फोन आला. एका कास्टिंग डायरेक्टरने तिला लीड रोलसाठी गोरेगावमध्ये एका मॉलमध्ये भेटायला सांगितलं. तसेच लखनऊमधून निर्माते येणार आहेत त्यांना खुश करावा लागेल, असं सांगितलं. तिने सगळे पुरावे दिले. त्यानंतर आमच्या महिला रणरागिणींनी त्या कास्टिंग डायरेक्टरला मॉल ते ठाणे घोडबंदर रोडपर्यंत ट्रॅप केलं. ज्या गाडीत त्या मुलीला कास्टिंग डायरेक्टर घेऊन जात होता त्याला मनसे सैनिकांनी ट्रॅप केलं”, असं अमेय खोपकर यांनी सांगितलं.
“निर्मात्यांनी एका फार्महाउसला गाडी थांबविली. त्यांनी रस्त्यात दारुही घेतली. तिथे पोहोचल्यानंतर 4 निर्माते होते. बिरालाल यादव, राहुल यादव, कंचन यादव, जयजेश यादव अशी त्यांची नावे होते. मनसे सैनिकांनी त्यांना चोप दिला आणि पोलिसांच्या हवाले केला. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत आहोत. त्यात एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी देखील आहे. अजून जर कुणाला या लोकांपासून त्रास झाला असेल तर त्यांनी लगेच आम्हाला संपर्क करावा’, असं आवाहन खोपकर यांनी केलं.
“मुलींसोबत जर कुणी असं करत असेल तर त्यांचे हात-पाय तोडणार आणि तुमच्या प्रदेशात पाठवणार. ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. इकडे राज ठाकरेंचं राज चालतं. सगळ्या भगिनींना आव्हान जर कुणी असा प्रयत्न केला तर आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत”, असंदेखील खोपकर म्हणाले.
मारहाणीचा व्हिडीओ बघा :
नवोदित अभिनेत्रीकडे लीड रोलसाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चोपला @mnsadhikrut @MNSAmeyaKhopkar pic.twitter.com/YpztDI9Khp
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) July 29, 2021
हेही वाचा : पोलीस कॉन्स्टेबल असल्याचा माज? तरुणाला मरेपर्यंत मारलं, नंतर फेकून दिलं, मारहाणीचा व्हिडीओ समोर