‘बेकायदा बांधकामांचं काय तर अधिकृत बांधकामेचेही फूटामागे पैसे घेतले जातात’, मनसे आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Sep 06, 2021 | 11:28 PM

बेकायदा बांधकामासाठी बदनाम असलेली केडीएमसी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डीपी रस्त्यात येणाऱ्या सहामजली बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्यात आली.

बेकायदा बांधकामांचं काय तर अधिकृत बांधकामेचेही फूटामागे पैसे घेतले जातात, मनसे आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
'बेकायदा बांधकामांचं काय तर अधिकृत बांधकामेचेही फूटामागे पैसे घेतले जातात', मनसे आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
Follow us on

कल्याण (ठाणे) : बेकायदा बांधकामासाठी बदनाम असलेली केडीएमसी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डीपी रस्त्यात येणाऱ्या सहामजली बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप बिल्डरने केला आहे. तसेच काही केडीएमसी अधिकारी संबंधित बिल्डरसोबत हॉटेलमध्ये बसल्याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणावर मनसे आमदार राजू पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

डीपी रस्त्यात येणाऱ्या सहामजली बेकायदा इमारत चार दिवसांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आली. या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप बिल्डरने केला आहे. तर या प्रकरणाची चौकशी करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे बिल्डरसोबत एका हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांच्या चर्चेचा सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यावर एकच खळबळ उडाली आहे.

बिल्डराचे नेमके आरोप काय?

कल्याण पूर्व भागातील दावडी परिसरात डीपी रस्त्यात येणाऱ्या सहामजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीने चार दिवसापूर्वी कारवाई केली. ही कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण या इमारतीचा बिल्डर मुना सिंग याने केडीएमसी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यांनी वारंवार पैसे उकळले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका हॉटेलमध्ये बिल्डर सिंग यांच्यासोबत केडीएमसी अधिकारी दीपक शिंदे, उपायुक्त अनंत कदम यांची बैठक झाली. या बैठकीचा सीसीटीव्ही फूटेज समोर आला आहे. मुना सिंग यांच्याकडून अधिकाऱ्यांनी कारवाई न करण्यासाठी लाखो रुपये घेतले आहे. आयुक्तांच्या नावावर सुद्धा पैसे अधिकाऱ्यांनी घेतले, असा आरोप बिल्डरने केला आहे.

महापालिका आयुक्तांची भूमिका काय?

बिल्डरांच्या आरोपानंतर केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे बिल्डराचा आरोप काहीही असू द्या. पण अधिकारी बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डराच्यसोबत हॉटलेमध्ये बसून काय चर्चा करीत होते? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. बिल्डर आणि अधिकारी यांच्यातील साठंलोटं सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यावर आता आयुक्त काय कारवाई करतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसे आमदार काय म्हणाले?

या प्रकरणावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पकडला गेला तर चोर. बेकायदा बांधकामे एका रात्रीत उभी राहतात? बेकायदा बांधकामांसाठी पैसे घेतले जातात. बेकायदाच काय तर अधिकृत बांधकामाचेही फूटामागे 75 रुपये घेतले जातात, अशी चर्चा आहे”, असा गंभीर आरोप राजू पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तसेच चौकशी करणारेच यांच्यात सामील असतील तर काय निष्पन्न होणार? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

डोक्यात दगड टाकून तरुणाची हत्या, पुण्याच्या चाकणमध्ये एकच खळबळ, हत्येमागे नेमकं कारण काय?

पाय घसरुन लहान भाऊ शेततळ्यात पडला, मोठ्याच्या जीवाचा आटापिटा, भावाला वाचवण्यासाठी त्यानेही उडी मारली, पण…