मुलुंड : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 12 तासांच्या आत मुलुंडमध्ये दोन हत्या(Murder) घडल्या आहेत. पहिल्या घटनेमध्ये एका मोबाईल चोराला नागरिकांनी बेदम चोप दिला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर दुसरी हत्या ही टोळी युद्धातून घडली आहे. मोहम्मद रफीक मोहम्मद शफीक शेख आणि निलेश साळवे अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यापैकी रफीक हा मोबाईल चोर (Mobile Thief) होता तर निलेश हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) होता. दरम्यान या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांची हत्या झाल्यामुळे मुलुंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी पहाटे मोहम्मद रफीक मोहम्मद शफीक शेख मुलुंड कॉलनी परिसरामध्ये एका घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि त्याला बेदम चोप दिला. या मारहाणीत रफिकला जबर दुखापत झाली आणि तो बेशुद्ध पडला. मुलुंड पोलिसांनी त्याला अगरवाल पालिका रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात सुनील कुमार लाल, संतोष कुमार सहानी, फुलो सहानी आणि कपिल शर्मा या चार जणांना मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये निलेश साळवे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. टोळी युद्धातून चेतन शिरसाट नामक गुन्हेगार आणि त्याच्या अन्य सात साथीदारांनी मिळून ही निर्घृण हत्या केली. निलेश आणि चेतन हे दोघे एका हत्येच्या गुन्ह्यांमध्ये सहआरोपी होते. कालांतराने त्यांच्यामध्ये वाद निर्माण होत गेले आणि दोघांनी आपल्या टोळ्या तयार केल्या. बुधवारी निलेश वाढदिवसाची पार्टी करून घरी परतत असताना त्याला चेतन आणि त्याच्या साथीदारांनी अडवले. त्यांच्यामध्ये जुन्या प्रकरणावरून वाद सुरू झाले. त्यातच चाकूच्या साह्याने चेतन आणि त्याच्या साथीदारांनी निलेश याच्या गळ्यावर आणि छातीवर वार केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी निलेश याला रुग्णालयात दाखल केले. परंतु आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस या आरोपींच्या शोधात आहेत. (Mobile theft in Mulund and double murder from gang war in mulund)