मुंबई : मॉडेल-अभिनेत्री कुलजीत रंधावा (Kuljeet Randhawa) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ‘ग्लॅडरॅग्ज’ (Gladrags) ची मॉडेल म्हणून नाव कमवलेली कुलजीत बोल्ड आणि महिलाकेंद्रित भूमिकांसाठी प्रसिद्ध होती. ‘कॅट्स’, ‘स्पेशल स्क्वॉड’ आणि ‘कोहिनूर’ यासारख्या टीव्ही मालिकांमधील व्यक्तिरेखांसाठी तिने लोकप्रियता मिळवली होती. मात्र आयुष्यातील ताणतणावांना कंटाळून वयाच्या अवघ्या तिशीतच 8 फेब्रुवारी 2006 रोजी तिने आयुष्याची अखेर केली.
कुलजीत रंधावा हिचा जन्म 29 जानेवारी 1976 रोजी पश्चिम बंगालमधील रानीगंज येथे झाला. तिचे वडील भारतीय पोलिस दलात कार्यरत होते. त्यामुळे कुलजीतचा पंजाबसह भारतभर प्रवास झाला. तिच्या आत्महत्येच्या वेळीही वडील पटियालामध्येच सेवा बजावत होते.
‘हिप हिप हुर्रे’तून करिअरला सुरुवात
दिल्ली विद्यापीठातून कुलजीतने मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. विद्यार्थीदशेतच तिने मॉडेलिंगलाही सुरुवात केली होती. बड्या डिझायनर्ससह काही जाहिरातींमध्येही तिने काम केलं. कुलजीतने ‘हिप हिप हुर्रे’ या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली. अभिनेत्री श्वेता साळवेच्या जागी ‘प्रिषिता’ची भूमिका ती साकारत होती. मात्र तिच्या अभिनयाचं कौतुक झालं, ते UTV च्या C.A.T.S. या मालिकेतील नवीन लीड म्हणून. तिने अॅश ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री करमिंदर कौरची रिप्लेसमेंट घेतली होती.
रडक्या भूमिकांवर नाखुश
कुलजीत रंधावाने एक मॉडेल म्हणून मोठं यश कमावलं होतं, परंतु अभिनयाच्या बाबतीत ती प्रचंड चोखंदळ होती. ‘कॅट्स’नंतर ती मुख्य भूमिकेत दिसली नाही आणि दीर्घ काळानंतर तिने स्टार वनच्या ‘स्पेशल स्क्वॉड स्टार वन’मध्ये मुख्य भूमिकेतून पुनरागमन केलं. भारतीय टेलिव्हिजनवर अभिनेत्रींच्या वाट्याला येणाऱ्या रडक्या भूमिकांवर ती नाखुश होती. तिने नेहमीच धाडसी आणि महिला केंद्रित भूमिकांची निवड केली. त्यामुळेच ती थ्रिलर भूमिकांसाठी टाईपकास्ट केली जायची. कुलजीत रंधावाने पाचपेक्षा जास्त टीव्ही शोमध्ये एखाद्या पोलीस किंवा डिटेक्टिव्हची भूमिका बजावली, जो कोणत्याही भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्रीसाठी एक विक्रम होता.
…आणि स्पेशल स्क्वॉडला रामराम
स्पेशल स्क्वॉडमधील तिच्या भूमिकेला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण मालिकेचे रेटिंग वाढवण्यासाठी अभिनेत्री गौरी प्रधान तेजवानीला शोमध्ये आणखी एक फीमेल लीड म्हणून साईन करण्यात आलं होतं. गौरीच्या एन्ट्रीनंतर अवघ्या सहा भागांनीच कुलजीतने व्यावसायिक निर्णय सांगत शो सोडला होता. कुलजीतने गौरीमुळेच शो सोडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, अर्थात हा दावा कुलजीतने कायमच खोडून काढला होता.
मुंबईतील राहत्या अपार्टमेंटमध्ये गळफास
छोट्या पडद्यावर धाडसी भूमिका साकारणाऱ्या कुलजीतची वैयक्तिक आयुष्यातील संकटं पेलण्याची कुवत संपत आली होती. तिसाव्या वाढदिवसानंतर अवघ्या दहा दिवसांतच कुलजीतने अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. 8 फेब्रुवारी 2006 रोजी कुलजीतने मुंबईतील जुहू येथील तिच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये ओढणीने गळफास घेतला. आयुष्यातील ताणतणाव आणि दडपण आपण आणखी काळ सहन करु शकत नाही, त्यामुळे जीवनयात्रा संपवत आहोत, असं कुलजीतने सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं.
बॉयफ्रेण्डसाठी काय लिहिलं होतं
प्रेम हे आयुष्य आहे. भानू, तू मला प्रेमाचा खरा अर्थ समजावला आहे. मी शरीराने तुझ्यासोबत नसेन, पण माझं प्रेम तुझ्यासोबत कायमस्वरुपी राहील, प्लीज मला माफ कर, लव्ह यू फॉरेव्ह, असा मजकूर कुलजीतने तिचा प्रियकर आणि स्पेशल स्क्वॉड शोमधील सहकलाकार भानू उदयला लिहिला होता.
कुटुंबीयांच्या नावेही मजकूर
आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये. आपले पैसे आणि सामान आपल्या पालकांना देण्याची विनंती तिने सुसाईड नोटमध्ये केली होती. तिने तिच्या पालकांची क्षमाही मागितली होती. “काही जण बळकट आहेत आणि काही कमकुवत आहेत. मी दुसऱ्या वर्गात मोडते. मला आशा आहे की जीवनासोबत मी जे काही केलं, त्याबद्दल ते मला क्षमा करेल.” अशा आशयाच्या ओळींनी तिने सुसाईड नोट संपवली होती.
वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी तिने जगाचा कायमचा निरोप घेतला आणि मनोरंजन विश्व एका गुणी अभिनेत्रीला मुकलं.
संबंधित बातम्या :